

Raghav Chadha Joins BJP: दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राघव चड्ढा यांच्यासोबतच राज्यसभा खासदार अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनीही AAP सोडून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. या तिघांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत बोलताना राघव चढा यांनी आपल्या पक्षावरच गंभीर आरोप केले. “माझ्याच पक्षाने माझा आवाज दाबला. मला माझे विचार मांडण्याची संधी दिली नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, राज्यसभेतील AAP च्या दोन-तृतीयांश सदस्यांनी भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. देशाच्या विकासासाठी मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत त्यांनी आपला पुढील राजकीय प्रवास भाजपसोबत करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे दिल्लीसह राष्ट्रीय पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात असून आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो.
राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल करत पक्ष सोडण्यामागची कारणे स्पष्ट केली. त्यांनी स्वतःला “चुकीच्या पक्षातला योग्य माणूस” असे संबोधले. पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीमुळे आपण गुदमरल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
राघव चढ्ढा म्हणाले की, पक्षाची आजची दिशा आणि काम करण्याची पद्धत ही पक्षाच्या मुळ तत्त्वांपासून पूर्णपणे वेगळी आहे. “मी या पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं. माझ्या आयुष्यातील 15 वर्षे या पक्षासाठी खर्च केली आहे. पण आता हा पक्ष आपल्या मूल्यांपासून आणि नैतिकतेपासून भरकटला आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी आरोप केला की, आता पक्ष देशहितासाठी नव्हे तर काही व्यक्तींच्या वैयक्तिक फायद्यासाठी काम करत आहे. “गेल्या काही वर्षांपासून मला सतत असं वाटत होतं की मी चुकीच्या पक्षातला योग्य माणूस आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राघव चढ्ढा यांनी दावा केला की आम आदमी पक्षातील राज्यसभेतील दोन-तृतीयांश खासदार त्यांच्या सोबत आहेत. त्यांनी सांगितले की अनेक खासदारांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत स्वाक्षऱ्या केल्या आहेत. म्हणजे 10 पैकी 7 खासदार बीजेपी मध्ये सामील होणार आहेत.
त्यांच्यासोबत हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता, संदीप पाठक, विक्रमजीत साहनी आणि अशोक मित्तल यांसारखे नेते असल्याचा दावा त्यांनी केला.
संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राघव चढ्ढा यांनी जाहीर केले की, राज्यसभेतील AAP चे दोन-तृतीयांश सदस्य भारतीय राज्यघटनेतील तरतुदींनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेत आहेत. या घडामोडींमुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.