भारत-फ्रान्समध्ये राफेल-एम लढाऊ विमान खरेदीबाबत गुरुवारी वाटाघाटी

भारत-फ्रान्समध्ये राफेल-एम लढाऊ विमान खरेदीबाबत गुरुवारी वाटाघाटी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : फ्रान्सकडून २६ राफेल-एम लढाऊ विमानांची खरेदी करण्याबाबतचा करार करण्यासाठी भारत आणि फ्रान्स या उभय देशांमध्ये उद्या (दि.३०) बोलणी केली जाणार आहे.

यासंदर्भात चर्चा करण्यासाठी फ्रान्स सरकारचे अधिकारी भारतात दाखल होणार असून संरक्षण मंत्रालयाच्या करार समितीशी चर्चा करणार आहेत. लढाऊ विमान खरेदीसोबतच फ्रान्ससोबत शस्त्रे, सिम्युलेटर, क्रूसाठी प्रशिक्षण आणि लॉजिस्टीक सपोर्ट याबाबत करार केला जाणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

या करारामध्ये २२ सिंगल सीट राफेल-एम विमाने आणि ४ डबल ट्रेनर सीट राफेल-एम विमाने भारत खरेदी करणार आहे. नौदलासाठी खरेदी केली जात असलेली ही सर्व राफेल-एम विमाने चीनचा मुकाबला करण्यासाठी हिंदी महासागरात तैनात केली जातील. दरम्यान, यापूर्वी भारताने सप्टेंबर २०१९ मध्ये फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली होती. तेव्हा ही खरेदी ५९ हजार कोटी रुपयांची होती. तर आता २४ राफेल-एम लढाऊ विमानांची खरेदी किती कोटींची होईल, याबाबत ही चर्चा होणार आहे.

अशी आहे राफेल-एम लढाऊ विमानांची क्षमता

राफेल-एम लढाऊ विमाने सागरी हल्ल्यांसाठी तयार करण्यात आली आहेत. भारताचे विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवर ही विमाने तैनात केली जातील. या विमानांची लांबी १५.२७ मीटर, रुंदी १०.८० मीटर, तर वजन १० हजार ६०० किलो आहे. या विमानांचा वेग ताशी १९१२ किलोमीटर असून, ५० हजार फूट उंचीपर्यंत ते उड्डाण करु शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news