Rafale Sukhoi Assam highway | चीनच्या सीमेजवळ भारताची मोठी झेप; आसामच्या महामार्गावर उतरणार राफेल आणि सुखोई
दिसपूर; वृत्तसंस्था : चीनच्या सीमेपासून (एलएसी) अवघ्या काहीशे किलोमीटर अंतरावर भारताने सामरिकद़ृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागाचे रूपांतर धावपट्टीत करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 14) या 4.2 किलोमीटर लांबीच्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचे उद्घाटन करणार आहेत. ईशान्य भारतातील ही पहिलीच हायवे एअरस्ट्रिप असून, ती दिब्रुगड-मोरान राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. युद्धजन्य परिस्थितीत हवाई तळांचे नुकसान झाल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हवाई दलाच्या विमानांना तातडीने उतरवण्यासाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी स्वतः विमानातून या एअरस्ट्रिपवर उतरणार आहेत. उद्घाटनाच्या काही दिवस आधीच हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी या महामार्गावर केलेल्या टच-अँड-गो ऑपरेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भव्य एअर शो होणार
या ऐतिहासिक क्षणी महामार्गावर एक भव्य एअरशो आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय हवाई दलाची सुमारे 16 विमाने सहभागी होणार आहेत. यामध्ये राफेल, सुखोई यांसारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि सी-17 ग्लोबमास्टर व सी-130 जे सुपर हॅरक्यूलिस यांसारखी अवजड मालवाहू विमाने महामार्गावर लँडिंग आणि टेक-ऑफ करतील.

