

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला अखंड आणि विश्वासार्ह इंधन पुरवठा सुरू ठेवण्याची हमी दिली. अमेरिकेकडून वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचे हे विधान भारताच्या ऊर्जानितीला मोठा दिलासा देणारे आहे. भारताप्रती असलेल्या रशियाच्या अटल वचनबद्धतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांचे आभार मानले. ऊर्जा सुरक्षा ही भारत-रशिया भागीदारीचा एक मजबूत आणि महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, रशिया हा तेल, वायू, कोळसा आणि भारताच्या ऊर्जा विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व संसाधनांचा विश्वासार्ह पुरवठादार आहे. वाढत्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आम्ही इंधनाची अखंड निर्यात सुरू ठेवण्यास पूर्णपणे तयार आहोत.
अमेरिकेचा दबाव वाढत असताना रशियाची हमी
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियन तेलाची खरेदी कायम ठेवल्यामुळे अमेरिकेने अनेक वेळा नाराजी व्यक्त केली आहे. ऑगस्टमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुतेक भारतीय वस्तूंवर ५०% कर लादला होता, आणि त्यामागे भारताची रशियन तेल खरेदी सुरूच असल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता. अमेरिकेचा दावा आहे की या खरेदीतून रशियाला मिळणारा महसूल युक्रेनमधील युद्धासाठी निधी पुरवतो. अशा परिस्थितीत भारताला इंधनपुरवठा अखंडपणे सुरू ठेवण्याची पुतिन यांनी दिलेली खात्री ही भारत-रशिया ऊर्जा सहकार्याच्या दृढतेचे प्रतीक मानली जात आहे.
ऊर्जासुरक्षेत रशिया महत्त्वाचा स्रोत
भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजा लक्षात घेता रशिया दीर्घकाळापासून महत्त्वाचा स्त्रोत राहिला आहे. विशेषतः रशियन कच्च्या तेलावरील सवलती आणि विश्वसनीय पुरवठ्यामुळे भारताने युद्धकाळातही खरेदी थांबवली नाही. रशियाने दिलेली ताजी हमी भारताच्या ऊर्जा पुरवठा साखळीला मजबुती देणारी ठरेल, तसेच दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारी आणखी सखोल करण्यास मदत करेल, असे तज्ञांचे मत आहे.