

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी भारत सरकारच्या वतीने विशेष स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. मात्र काँग्रेस खासदार शशी थरूर यांना निमंत्रण देण्यात आले होते.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा २ दिवसांचा भारत दौरा शुक्रवारी रात्री आटोपला. अतिशय व्यस्त आणि महत्वाच्या या दौऱ्याच्या शेवटी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या वतीने स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कोणाकोणाला निमंत्रण असणार याची उत्सुकता दौऱ्याच्या पूर्वीपासून होती. वेगवेगळे कयास या संदर्भात बांधले जात होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावण्यात आले आहे, अशाही चर्चा होत्या. मात्र काँग्रेस पक्षाच्या वतीन काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केले की, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना या स्टेट डिनरचे निमंत्रण देण्यात आले नाही.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना शशी थरूर म्हणाले की, मला निमंत्रण मिळाले आहे आणि मी नक्कीच या डिनरला उपस्थित राहीन. एक काळ असा होता जेव्हा परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षांना नित्यनेमाने निमंत्रण मिळत होते. ही प्रथा काही काळासाठी थांबली होती, मात्र ती पुन्हा सुरू झाली आहे असे दिसते. कारण मला निमंत्रण मिळाले आहे. तर मल्लिकार्जुन खर्गे, पक्षनेते राहुल गांधी यांना निमंत्रण मिळाले नाही, याबाबत बोलताना ते म्हणाले की, मला या निमंत्रणाचा आधार माहित नाही. मात्र आपल्या परंपरा पाळल्या पाहिजेत. पूर्वी विरोधी पक्षनेत्यांना आणि इतर पक्षांच्या नेत्यांना देखील आमंत्रित केले जात असे. परंतु आता आमंत्रणे कशी पाठवली जातात, हे मला माहित नाही, असेही थरूर म्हणाले.