

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने हा छापा टाकल्याचे सांगितले जात आहे. आयोगाचे पथक कपूरथळा हाऊसमध्ये पोहोचले आहे.
५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणूक होत आहे. दिल्लीत प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात गुंतले असतानाच ही घटना घडली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकारण चांगलंच तापलं आहे.
आप नेत्या आतिशी यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आम्ही कोणताही छापा टाकला नाही. आयोग तपास यंत्रणांच्या कामात कधीही हस्तक्षेप करत नाही. या कारवाईवर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोशल मिडिया 'एक्स'वर लिहिले आहे की, दिल्ली पोलिस भगवंत मान यांच्या दिल्लीतील घरावर छापा टाकण्यासाठी पोहोचले आहेत.
भाजपचे लोक दिवसाढवळ्या पैसे, बूट आणि चादरी वाटत आहेत, पण ते निवडणूक आयोगाला दिसत नाही. त्याऐवजी, ते निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी पोहोचतात. व्वा भाजपा! अशी टीकाही आतिशी यांनी केली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दिल्लीत प्रचारासाठी तळ ठोकून आहेत. आम आदमी पक्षाच्या उमेदवारांसाठी भगवंत मान दिल्लीत प्रचारसभा घेत आहेत.