

Pune law student : ऑपरेशन सिंदूरशी संबंधित सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पुण्यातील २२ वर्षीय कायद्याची विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. शर्मिष्ठा पानोली असे तिचे नाव आहे. कोलकाता पोलिसांनी गुरुग्राममध्ये शुक्रवारी (दि. ३० मे) रात्री ही कारवाई केली.
ऑपरेशन सिंदूर संबंधित शर्मिष्ठाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून अपमानजनक टिप्पणी केली होती. काही वेळाने तिने हा व्हिडिओ हटवला. मात्र ही क्लिप व्हायरल झाली. याप्रकरणी कोलकातामधील पोलिस ठाण्यात शर्मिष्ठाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कोलकाता पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिला शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली.
शर्मिष्ठाने व्हिडिओ हटविला असला तरी पानोलीने एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून अपमानजनक टिप्पणी केली होती. तसेच आपल्या कुटुंबासह ती फरार झा्यामुळे तिला कायदेशीर नोटीस बजावण्याचे प्रयत्नही करता आले नाहीत. त्यानंतर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. यानुसार तिला गुरुग्राममधून अटक करण्यात आल्याचे कोलकाता पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
झालेल्या प्रकाराबाबत शर्मिष्ठा पोनोलीने 'एक्स'वर पोस्ट करत बिनशर्त माफी मागितली आहे. तिने लिहिलं आहे की, "मी बिनशर्त माफी मागते. मी सोशल मीडियावर जे मांडलं त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत .मी जाणूनबुजून कोणालाही दुखावू इच्छित नव्हते. कोणी दुखावले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. मला सहकार्य आणि समजूतदारपणाची अपेक्षा आहे. यापुढे, मी माझ्या सार्वजनिक पोस्टमध्ये सावध राहीन. पुन्हा एकदा, कृपया माझी माफी स्वीकारा."