पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर विरोधी पक्षांकडून टीकेचा आसूड ओढला गेला. आता थेट तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी या प्रकरणी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या भ्रष्ट कारभारावरच बाेट ठेवत जनतेमधील संतापाची लाट दुर्लक्षित करता येणार नाही, असा इशाराही दिला आहे. (Kolkata rape-murder case )
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ( Kolkata rape-murder case ) पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरात डाॅक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली. प. बंगालसह सर्वच राज्यांमध्ये निदर्शने झाली. विविध स्तरातून संताप व्यक्त हाेत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत राज्य सरकारला फटकारले. आता पक्षातील खासदारांनीही या प्रकरणी ममता बॅनर्जी यांना घरचा आहेर दिला आहे.
जवाहर सरकार यांनी तृणमूलमधील भ्रष्ट लोकांची अनियंत्रित गुंडगिरीवर भाष्य केले आहे. तसेच अनेक महिने ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधता न आल्याने निराशा व्यक्त केली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याबद्दल आणि पक्षाने या समस्येकडे लक्ष न दिल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात जवाहर सरकार म्हणतात की, "राज्य सरकार भ्रष्टाचाराबद्दल आणि नेत्यांच्या एका वर्गाच्या वाढत्या मजबूत रणनीतींबद्दल फारसे बेफिकीर दिसत असल्याने माझा अधिकाधिक भ्रमनिरास झाला."
जवाहर सरकार पुढे लिहतात, " भ्रष्ट अधिकारी, डॉक्टर यांना प्रमुख आणि उच्च पदे मिळणे यासारख्या काही गोष्टी मी स्वीकारू शकत नाही. आरजी कार मेडिकल प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर जनतेचा आक्रोश तृणमूल सरकारवरील वाढत्या असंतोषाचे प्रतिबिंबित करतो. पक्षाने लोकांचा विश्वास गमावला आहे. माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत मी सरकारच्या विरोधात इतका संताप आणि संपूर्ण अविश्वास पाहिलेला नाही”.
"आरजी कार हॉस्पिटलमध्ये घडलेल्या भीषण घटनेनंतर मी महिनाभर धीराने सहन केले. सरकारकडून झालेली कारवाईला विलंब झाला. पक्षाने आपली वाटचाल सुधारली नाही तर जातीय शक्ती हे राज्य काबीज करतील, असाही इशारा त्यांनी आपल्या राजीनामा पत्रातून दिला आहे. मला तीन वर्षे बंगालचे प्रश्न संसदेत मांडण्याची दिलेल्या संधीबाबत मी पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो; पण मी खासदार म्हणून अजिबात राहू इच्छित नाही. केंद्र आणि राज्यांमधील भ्रष्टाचार, जातीयवाद आणि हुकूमशाहीशी लढण्याची माझी वचनबद्धता आहे. हे फक्त गैर-विघटनशील आहे", असेही जवाहर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
जवाहर सरकार हे १९७५ च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी आहेत. केंद्र सरकारमध्येही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. २००८ ते २०१२ या काळात सांस्कृतिक मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार सांभाळला होता. या मंत्रालयाचे सर्वाधिक काळ काम करणारे सचिव ठरले होते. २०१२ मध्ये काँग्रेस नेतृत्त्वाखालील 'संपुआ' सरकारने त्यांची प्रसार भारतीचे सीईओ म्हणून नियुक्ती केली होती. २०१६ मध्ये 'एनडीए' सरकारशी मतभेद झाल्याने त्यांनी नोकरीतील कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी सातत्याने विविध दैनिकांमधून केलेल्या स्तंभलेखनातून एनडीए सरकारच्या धोरणांवर सवाल उपस्थित केले होते. ऑगस्ट २०२१मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांना राज्यसभा खासदार केले होते. आता कोलकातामध्ये प्रशिक्षार्थी डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी संताप व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिला आहे.