Lok Sabha Results : खलिस्तानी समर्थक अमृतपाल, सरबजीतच्या ‘लोकसभा’ विजयाने देशाच्या सुरक्षेसाठी धोका?

Lok Sabha Results : खलिस्तानी समर्थक अमृतपाल, सरबजीतच्या ‘लोकसभा’ विजयाने देशाच्या सुरक्षेसाठी धोका?

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. तर दुसरीकडे काही अपक्ष उमेदवारांच्या विजयाचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात पंजाबमधील दोन तर जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे. निवडून आलेले उमेदवार हे फुटीरतावादी म्हणून ओळखले जातात. यात खादूर साहिब (पंजाब) येथून अमृतपाल सिंग, फरीदकोट (पंजाब) येथून सरबजीत सिंग खालसा आणि बारामुल्ला (जम्मू-काश्मीर) येथून अब्दुल रशीद शेख यांनी निवडणूक जिंकली. विशेष म्हणजे या तीनपैकी दोन उमेदवार हे तुरुंगात आहेत. त्या दोघांवर युएपीए (UAPA) सारखे मोठे गुन्हे दाखल आहेत. या तिघांच्या विजयामुळे देशातील लोकशाहीची मजबूत मुळे दिसून येतात, पण गांभीर्याने पाहिल्यास तिन्ही उमेदवारांचा विजय देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो.

पंजाब राज्यात 13 पैकी 7 जागा काँग्रेसने जिंकल्या असून आम आदमी पक्षाने 3 जागा जिंकल्या आहेत. शिरोमणी अकाली दलाने एका जागेवर तर दोन जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. येथे भाजपचा सफाया झाला आहे. या सर्वांत अमृतपाल सिंग आणि सरबजीत सिंग खालसा या अपक्षांची चर्चा रंगली आहे. खादूर साहिब आणि फरीदकोट हे दोन्ही मतदार संघ पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील असल्याने दहशतवादाला बळ मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमृतपाल आणि सरबजीत यांच्या विजयानंतर पंजाबचे राजकारण ढवळून निघेल अशी शक्यता आहे.

अमृत पाल सिंग हा खलिस्तानी समर्थक 'वारीस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख आहे. तर सरबजीत सिंग खालसा हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेक-यापैकी एक असणा-या बेअंत सिंगचा मुलगा आहे. या दोघांनी अनुक्रमे खदूर साहिब आणि फरीदकोट जागांवर विजय मिळवला आहे. पण या विजयाने इथल्या पारंपरिक राजकीय पक्षांविरोधात शीख समाजात नाराजी आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच येथे फुटीरतावादाची नवी आघाडी फोफावण्याची शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे.

कोण आहे अमृतपाल सिंग?

अमृत ​​पाल सिंग हा केवळ खलिस्तानी समर्थक नाहीत, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोपही आहे. अमृतपालवर एनएसएसह 16 गुन्हे दाखल आहेत. पंजाब पोलिसांनी त्याला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भिंद्रनवालेच्या रोडे गावातून अटक केली होती. तो सध्या आसाममधील दिब्रुगढच्या तुरुंगात एका वर्षाहून अधिक काळ कैदेत आहे. अशा परिस्थितीत त्याचे वडील बापू तरसेम सिंग आणि आई बलविंदर कौर यांनी प्रचार केला.

अमृत ​​पालने खदूर साहिब लोकसभा मतदार संघात 404430 मते मिळाली. त्याने 197120 मताधिक्याने विजय मिळवला आहे. येथील गुरुद्वारा अतिशय पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की गुरु नानक देव येथे सुमारे 5 वेळा आले होते. या महत्त्वाच्या जागेवर अमृतपालचा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने तुरुंगातून निवडणूक लढवली आणि ती जिंकली. पंजाबला ड्रग्जमुक्त करणे हा त्याचा मुख्य निवडणुकीचा मुद्दा होता.

2023 मध्ये केंद्रीय एजन्सी आणि पंजाब पोलिसांनी अमृतपालच्या शोधासाठी मोठी मोहीम हाती घेतली होती. मार्च 2023 ते एप्रिल 2023 पर्यंत ही मोहीम सुरू राहिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अमृतपाल स्वत:ला खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले सारखा सादर करायचा आणि तो ड्रग्जच्या विरोधात मोहीम चालवत असल्याचा दावा करत असे. त्याने आपले हजारो समर्थक तयार केले होते. तसेच त्याने लोकांना लढण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारले होते. त्याला 4 लाखांहून अधिक मते मिळणे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी अजिबात चांगले लक्षण नसल्याचे बोलले जात आहे.

कोण आहे सरबजीत सिंग खालसा?

सरबजीत सिंग खालसा हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मारेकरी बेअंत सिंग यांचा मुलगा आहे. त्याने फरिदकोर्टमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून 70,053 मतांनी विजय मिळवला. त्याला 298062 मते मिळाली. सरबजीत सिंगने आप उमेदवार करमजीत अनमोलचा पराभव केला. 2015 मध्ये गुरु ग्रंथ साहिबच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करून तो चर्चेत आला होता. खरेतर तो इंदिरा गांधी यांच्या मारेक-याचा मुलगा असल्यामुळे वादात सापडला होता. पण शीख संगतच्या सांगण्यावरून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्याने म्हटले होते. अमली पदार्थांचे सेवन, गरीब शिक्षण, बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवरून त्याने निवडणूक लढवली.

45 वर्षीय सरबजीत सिंग खालसा हा मोहालीचा रहिवासी आहे. त्याला राजकीय वारसा आहे. 1989 मध्ये त्याची आई बिमल कौर खालसा या रोपरमधून लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. तर आजोबा सुचा सिंग यांनी भटिंडा मतदारसंघातून विजय मिळवला होता. दोघेही शिरोमणी अकाली दल (अमृतसर) तिकिटांवर लढले होते. हाच वारसा पुढे चालवत सरबजीत सिंगने 2004, 2007 आणि 2014 मध्ये निवडणूक लढवली. त्यावेळी त्याला दोनदा शिरोमणी अकाली दल (अमृतसर) आणि एकदा बहुजन समाज पार्टीने तिकिट दिले होते.

कट्टरपंथीयांची वाढती लोकप्रियता वाढत असल्याचे निवडणूक निकालांवरून दिसते आहे. ही राज्यातील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारसाठी सर्वात मोठी समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे मुख्यमंत्री मान यांच्याकडे अशा विघातक मानल्या जाणा-या शक्तींचा उदय रोखण्याची बुद्धिमत्ता आणि राजकीय परिपक्वता आहे का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, निवडणूक निकालातील या घडामोडीचा पंजाबच्या राजकारणावर तात्काळ प्रभाव पडेल अशी अपेक्षा नसली तरी, पंजाबमध्ये काँग्रेसने आप सोबत युती न केल्याचा हा थेट परिणाम आहे. असे विश्लेषकांचे मत आहे.

बारामुल्लामध्ये फुटीरतावादी नेत्याचा विजय

केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला लोकसभा जागेवर अपक्ष उमेदवार आणि तिहार तुरुंगात टेरर फंडींगअंतर्गत अटकेत असणारा अब्दुल रशीद शेख विजयी झाला आहे. त्याला 45.7 टक्के मते मिळाली. त्याने 4 लाख 72 हजार 481 मते मिळवून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा सहज पराभव केला. ओमर अब्दुल्ला यांना केवळ 25.95% म्हणजेच 2 लाख 68 हजार 339 मते मिळाली. अब्दुल रशीद शेख UAPA कायद्यांतर्गत दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैदेत आहे.

अब्दुल रशीद शेख हा जम्मू काश्मीर अवामी इत्तेहाद पार्टीचा संस्थापक आहे. त्याला इंजिनिअर रशीद म्हणूनही ओळखले जाते. त्याने 2008 आणि 2014 ची विधानसभा निवडणूकही अपक्ष म्हणून लढवली होती. 2019 च्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता. टेरर फंडिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर तो 2019 पासून तुरुंगात आहे. युएपीए अंतर्गत तुरुंगात गेलेला पहिला मोठा नेता म्हणून अभियंता रशीदचे नाव घेतले जाते.

संवेदनशील संसदीय दस्तऐवजांमध्ये प्रवेश

खासदार झाल्याने या फुटीरतावाद्यांना केंद्र सरकारशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे मिळतील. अशा माहितीचा उपयोग जनभावना प्रभावित करण्यासाठी केला जाऊ शकतो. काही खासदारांनी त्यांचे पासवर्ड अनधिकृत व्यक्तींसोबत शेअर केल्याचे पुरावे आहेत, महुआ मोइत्रा यांचे उदाहरण आहे. ज्यांची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती. सुरक्षिततेचे अनेक स्तर असूनही, दस्तऐवजांमध्ये या प्रकारचा प्रवेश धोकादायक असू शकतो.

राष्ट्रीय सुरक्षेला धोका वाढला?

लोकशाही व्यवस्थेत पक्ष आणि विचारसरणीची पर्वा न करता अपक्ष उमेदवारांचे यश हे निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेचा पुरावा आहे. तथापि, फुटीरतावादी नेत्यांचा असा विजय धोक्याची घंटा वाजवतो आणि राष्ट्रीय सुरक्षेला संभाव्य धोका निर्माण करू शकतो. या नेत्यांच्या फुटीरतावादी आणि खलिस्तान समर्थक विचारधारा प्रादेशिक तसेच राष्ट्रीय समतोल बिघडवू शकतात. या विजयांकडे देशासाठी एक इशारा म्हणून पाहिले पाहिजे. लोकशाही प्रक्रिया टिकवून ठेवतानाच फुटीरतावादी आणि दहशतवादी विचारसरणीला फोफावणाऱ्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अब्दुल रशीद शेख, सरबजितसिंग खालसा आणि अमृतपाल सिंग यांचे विजय हे देखील स्पष्ट संकेत आहेत की लोकशाही स्वातंत्र्याचा आधारस्तंभ असताना, सतर्क सुरक्षा उपायांशिवाय राष्ट्रीय सुरक्षेसाठी दुधारी तलवार देखील असू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news