

रेहान वाड्रा आणि अवीवा हे बालपणापासूनचे मित्र आहेत. दोघांचेही प्राथमिक शिक्षणही एकाच शाळेत झाले आहे. अवीवा या आपल्या आईप्रमाणेच इंटीरियर डिझायनिंगमध्ये कार्यरत आहेत
Priyanka Gandhi's son Engagement
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांचे सुपुत्र रेहान वाड्रा याचा साखरपुडा मैत्रीण अवीवा बेगबरोबर निश्चित झाला आहे. अवीवा दिल्लीतील रहिवासी आहे. दोन्ही कुटुंबांनी हा कार्यक्रम अत्यंत खाजगी ठेवला असून, केवळ जवळच्या नातेवाईकांनाच याची कल्पना देण्यात आली होती, अशी माहिती प्रियंका गांधींच्या निकटवर्तीयांनी दिली.
कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांचे सुपुत्र रेहान वाड्रा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रेहान यांनी अवीवा यांची सात वर्षांपासूनची मैत्री आहे. आता या मैत्रीचे नात्यात रुपांतर होणार आहे. अवीवा यांचे कुटुंब दिल्लीतील असून वाड्रा आणि बेग कुटुंबामध्ये जुने ऋणानुबंध आहेत.
सूत्रांनी सांगितले की, रेहान आणि अवीवा यांच्या साखरपुड्याचा मुख्य सोहळा उद्या (दि. ३१) रणथंभोर येथे पार पडणार आहे. अवीवा यांचे वडील इम्रान बेग हे व्यवसायाने उद्योजक आहेत, तर आई नंदिता बेग या नामांकित इंटीरियर डिझायनर आहेत. विशेष म्हणजे, नंदिता बेग आणि प्रियंका गांधी या जुन्या मैत्रिणी आहेत. काँग्रेस मुख्यालय 'इंदिरा भवन'च्या अंतर्गत सजावटीमध्येही नंदिता बेग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
रेहान आणि अवीवा हे बालपणापासूनचे मित्र आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षणही एकाच शाळेत झाले आहे. अवीवा या आपल्या आईप्रमाणेच इंटीरियर डिझायनिंगमध्ये कार्यरत आहेत. त्यांना फोटोग्राफीचीही आवड आहे. दुसरीकडे, रेहान वाड्रा विजुअल आर्टिस्ट आणि फोटोग्राफर आहेत. दरम्यान, रेहान वाड्रा अनेकदा आई प्रियंका गांधी यांच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले असले तरी, त्यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले आहे. त्यांनी नुकतेच 'डार्क परसेप्शन' नावाने स्वतःच्या फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवले होते.