

नवी दिल्ली: प्रियंका गांधी लोकाभिमुख मुद्द्यांवर आवाज उचलतात आणि काँग्रेसचे खासदारही त्यांना भावी पंतप्रधान म्हणून पाठिंबा देतात. त्यांनी इंदिरा गांधींकडून खूप काही शिकले आहे आणि त्यांचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. लोक त्यांच्यात इंदिरा गांधींना पाहतात, असे वक्तव्य काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वढेरा यांनी केले.
प्रियंका गांधींकडे पक्षाचे नेतृत्व सोपवले पाहिजे, अशी मागणी अलीकडेच काँग्रेस मधील एका माजी आमदाराने केली होती. त्यानंतर काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनीही भाजपवर टीका करताना प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वढेरा एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, प्रियंका गांधी खूप मेहनत करत आहेत. त्यामुळे निश्चित लोक त्यांच्याकडे आदराने पाहतात. तर राहुल गांधींबद्दल बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधीही खूप मेहनत करत आहे. राजकारण त्यांच्या रक्तात आहे.
यापूर्वी प्रियंका गांधींकडे पक्षाचे नेतृत्व सोपवावे, यासंदर्भातील वक्तव्य पक्षातील काही नेत्यांकडून केले जात होते. त्यानंतर आता थेट रॉबर्ट वढेरा यांनी यासंदर्भातले वक्तव्य केले. हे वक्तव्य करताना संदर्भ कार्यकर्त्यांचा दिला असला तरी या माध्यमातून वढेरा यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून नवी चर्चा जोर धरण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये रॉबर्ट वढेरा यांच्या वक्तव्यांना कोणी फार गांभीर्याने घेत नाहीत, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांचे हे नवे वक्तव्य इथेच थांबणार की ते आणखी याचा पुढचा अंक काढणार, हे पाहणे औत्सुकत्याचे असेल.