

मुंबई : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे देशांतर्गत मागणी घटल्याने खासगी क्षेत्राने मार्च महिन्यात गेल्या तीन वर्षांतील सर्वात खराब कामगिरीची नोंद केली. विशेष म्हणजे, या कालावधीत नवीन आंतरराष्ट्रीय मागणीत विक्रमी वाढ नोंदविण्यात आली आहे.
आखाती देशांत 28 फेब्रुवारीला युद्धास सुरुवात झाली. त्यामुळे आर्थिक वर्षातील शेवटच्या महिन्यात सेवा आणि उत्पादन क्षेत्राला फटका बसला आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेची गती यंदा मंदावणार असल्याचे संकेत मिळत आहेत. डिसेंबर 2025 अखेरीसच्या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 7.8 टक्के होते. त्यापूर्वीच्या तिमाहीत 8.4 टक्के जीडीपी होता. जागतिक अस्थिरतेचा फटका शेवटच्या तिमाहीत बसणार असल्याचे दिसून येत आहे.
‘एचएसबीसी’ने एस अँड पी ग्लोबलच्या सहकार्याने पॅचेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) जाहीर केला. त्यानुसार ‘पीएमआय’ 58.9 वरून 56.5 टक्क्यांवर आला आहे. ‘पीएमआय’ निर्देशांक 50 अंकांवर असल्यास उत्पादन-सेवा क्षेत्राची वाढ मानली जाते. मात्र, वाढीची गती 18 महिन्यांच्या नीचांकावर आली आहे; म्हणजेच वाढण्याची गती मंदावल्याचे स्पष्ट होते.
सेवा क्षेत्राचा ‘पीएमआय’ 58.1 वरून 57.2 टक्क्यांवर आला आहे. देशातील उद्योगांवर खर्चाचा दबाव वाढला आहे. मात्र, नफ्याचे प्रमाण कमी करून कंपन्या हा दबाव सहन करीत असल्याचे ‘एचएसबीसी’चे भारतातील मुख्य अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले.