नवी दिली, पुढारी वृत्तसेवा : चांद्रयान-3 मोहिमेमुळे जगभरात भारताच्या लौकिकात भर पडली असून देश जगाला दिशा दाखवण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दोन देशांचा यशस्वी दौरा आणि चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर त्यांनी रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमांतून देशवासीयांशी संवाद साधला.
ते म्हणाले, चांद्रयान-3 मोहिमेमुळे अशक्य ते शक्य करता येते, हे आपण शिकले पाहिजे. अपयश आणि त्रासाला कंटाळून आपण थांबले नसले पाहिजे. चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यामागे देशातील महिलांचे आणि मुलींचेही मोठे योगदान राहिले आहे. शेकडो महिलांनी या मोहिमेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष योगदान दिले आहे. देशाच्या कन्या आता अंतराळालाही आव्हान देत आहेत. कोणत्याही देशाच्या कन्या इतक्या महत्त्वाकांक्षी असतील, तर तो देश नक्कीच विकसित होईल. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर मी देशवासीयांना शुभेच्छा देतो.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला आहे. हे सर्व काही शक्य झाले आहे ते आपल्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमामुळेच! जी-20 देशांचे प्रतिनिधी ज्या ठिकाणी गेले तेथे त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. हे प्रतिनिधी भारताची विविधता आणि लोकशाही पाहून प्रभावित झाले. गेल्या वर्षभरापासून जी-20 परिषदेची जोरदार तयारी केली असून देशवासीयांनी ही परिषद यशस्वी करून देशाची जगभरात मान उंचावावी, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.
सप्टेंबर महिना भारताच्या सामर्थ्याचा साक्षीदार
जी-20 परिषदेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सप्टेंबर महिना भारताच्या सामर्थ्याचा साक्षीदार ठरणार आहे. जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी 40 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि अनेक जागतिक संघटनांचे प्रतिनिधी राजधानी दिल्लीत येत आहेत. जी-20 परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाज इतके प्रतिनिधी भारतात येत आहेत. बालीमध्ये भारताला जी-20 चे अध्यक्षपद मिळाल्यानंतर इतके सर्व काही चांगले घडले, त्याचा आम्हाला अभिमान आहे.