नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, आश्वासने देणे सोपे असते पण त्यांची नीट अंमलबजावणी करणे कठीण किंवा अशक्य असते हे काँग्रेस पक्षाला कळून चुकले आहे. प्रचारामधून काँग्रेस पक्ष लोकांना अशा गोष्टींचे आश्वासन देतो, मात्र या आश्वासनांची पूर्तता कधीही केली जात नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या पक्षाच्या कर्नाटक सरकारला केवळ आर्थिकदृष्ट्या योग्य आश्वासने देण्याचा सल्ला दिला. त्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पोस्ट करून काँग्रेसवर हल्ला चढवला. हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तिथे विकासाची वाटचाल बिकट होत असून आणि आर्थिक समस्या वाढत चालल्या आहेत असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसच्या फसव्या हमीला गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला बळी पडत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार पक्षांतर्गत राजकारण आणि जनतेची लूटमार करण्यात व्यस्त आहे. इतकेच नाही तर ते सध्याच्या योजनाही बंद करणार आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. हिमाचल प्रदेशात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. तेलंगणात शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. यापूर्वी, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांनी काही भत्ते देण्याचे वचन दिले होते जे पाच वर्षांपर्यंत कधीही लागू केले गेले नव्हते. काँग्रेस कशी चालते याची अशी असंख्य उदाहरणे आहेत, असे ते म्हणाले.
खोट्या आश्वासनांच्या काँग्रेस पुरस्कृत संस्कृतीविरुद्ध देशातील जनतेला जागृत व्हावे लागेल. हरियाणातील जनतेने त्यांचे खोटे कसे नाकारले आणि स्थिर, प्रगतीभिमुख आणि कृतीशील सरकारला प्राधान्य दिले हे आपण अलीकडे पाहिले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. काँग्रेसला दिलेले मत म्हणजे गैर-शासन, खराब अर्थकारण आणि अतुलनीय लूटमारीला दिलेले मत आहे, असा प्रत्यय भारतभर वाढत आहे, असे ते म्हणाले. भारतातील जनतेला विकास आणि प्रगती हवी आहे, असे त्यांनी सांगितले.