पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातली विरोधकांनी पुन्हा एकदा पराभव स्वीकारला आहे. ६० वर्षांनंतर लोकसभेत बहुमत मिळालं आहे. तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. देशातील जनतेने आम्हाला भरभरुन आशीर्वाद दिला आहे. विकसित भारतासाठी आम्हाला जनतेने संधी दिली आहे. जनतेने दिलेल्या या निर्णयाला काही लोकांनी जाणीवपूर्वक कलंकित करण्याचा प्रयत्न केला. असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना केले. Parliament Session 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " १० वर्षांनंतर सलग एक सरकार परत येणे ही भारताच्या लोकशाहीतील एक असामान्य घटना आहे. आता कुठे १० वर्षे झाले आहेत, अजुन २० वर्षे बाकी आहेत. यापेक्षा मोठे सत्य काय असू शकते. पुढे बोलताना ते म्हणाले, संविधानावरील विश्वासाची व्यापक भावना जागृत केली पाहिजे आणि संविधानाची समज विकसित झाली पाहिजे. संविधान हीच आपली प्रेरणा राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
पंतप्रधान म्हणाले, ही निवडणूक म्हणजे गेल्या १० वर्षांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करणारी आहे. पण या निवडणुकीत देशातील जनतेने आपल्या भविष्यातील विकासासाठी आम्हाला निवडून दिले आहे. देशातील जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांनी आम्हाला भविष्यातील स्वप्ने आणि संकल्प पूर्ण करण्याची संधी दिली. आम्ही गेल्या १० वर्षात जे काही केले आहे त्याचा वेग वाढवू.
पंतप्रधान म्हणाले, " शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करतो. गेल्या १० वर्षात शेती फायदेशीर बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि अनेक योजनांच्या माध्यमातून ती मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. एकप्रकारे बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, सूक्ष्म नियोजन करून शेतकऱ्यांसाठी प्रत्येक यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना तीन लाख कोटी दिले आहेत. सर्वसमावेशक पद्धतीने शेतीकडे पाहिले आहे.
काँग्रेसच्या कार्यकाळात १० वर्षात एकदाच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आहे. असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर केला आहे.
बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. म्हणाले, देशातील जनतेने त्यांचा पराभव केला आहे, त्यांच्याकडे ओरडण्याशिवाय काही उरले नाही.140 कोटी देशवासियांनी दिलेला निर्णय आणि जनादेश ते पचवू शकत नाहीत. महिलांवरील अत्याचारांबाबत विरोधकांची निवडक वृत्ती चिंताजनक आहे. असेही ते म्हणाले.