

Jagadguru Rambhadracharya Honor Jnanpith Award 2025
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी (दि.१६) राजधानी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे अभिनंदन केले. दरम्यान, पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू न शकलेल्या गुलजार यांचेही ज्ञानपीठ पुरस्कारासाठी त्यांनी अभिनंदन केले. गुलजार यांची प्रकृती लवकरच पूर्णपणे बरी होऊन ते सक्रिय व्हावेत आणि त्यांनी कला, साहित्य, समाज आणि देशासाठी योगदान देत राहावे, असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, साहित्य समाजाला एकत्र करते आणि जागृत करते. १९ व्या शतकातील सामाजिक जागृतीपासून ते २० व्या शतकातील आपल्या स्वातंत्र्यलढ्यापर्यंत, कवी आणि लेखकांनी लोकांना जोडण्यात मोठी भूमिका बजावली आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेले 'वंदे मातरम्' हे गीत गेल्या जवळजवळ १५० वर्षांपासून देशातील मुलांना जागृत करत आहे आणि नेहमीच करत राहील. वाल्मिकी, व्यास आणि कालिदासांपासून ते रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या कवींच्या रचनांपर्यंत, आपल्याला जिवंत भारताची नाडी जाणवते. ही नाडी भारतीयत्वाचा आवाज आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी १९६५ पासून विविध भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यिकांना पुरस्कार दिल्याबद्दल राष्ट्रपतींनी भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टचे कौतुक केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आशापूर्णा देवी, अमृता प्रीतम, महादेवी वर्मा, कुर्रतुल-ऐन-हैदर, महाश्वेता देवी, इंदिरा गोस्वामी, कृष्णा सोबती आणि प्रतिभा रे यांसारख्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महिला लेखिकांनी भारतीय परंपरा आणि समाजाचे विशेष संवेदनशीलतेने निरीक्षण केले आहे आणि आपले साहित्य समृद्ध केले आहे. आपल्या मुलींनी साहित्य निर्मितीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि या महान महिला लेखिकांकडून प्रेरणा घेऊन आपले सामाजिक विचार अधिक संवेदनशील बनवावेत, असेही त्या म्हणाल्या.
जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्याबद्दल बोलताना राष्ट्रपतींनी त्यांच्या बहुआयामी योगदानाचे कौतुक केले आणि सांगितले की दिव्यांग असूनही त्यांनी आपल्या दिव्य दृष्टिकोनाने साहित्य आणि समाजाची सेवा केली आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन भावी पिढ्या साहित्य निर्मिती, समाजनिर्माण आणि राष्ट्रनिर्माणात योग्य मार्गावर पुढे जात राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.