

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ऑपरेशन सिंदूर 1.0 ही लष्करी कारवाई तात्पुरती थांबली असली, तरी ती थांबलेली नाही. ऑपरेशनचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत कारवाई सुरूच राहील आणि भारतीय लष्कर संभाव्य ऑपरेशन सिंदूर 2.0 साठी सक्रिय तयारी करत आहे, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली.
दिवाळीच्या भेटीदरम्यान सीमावर्ती जिल्हा पिठोरगढ येथे जवानांशी बोलताना जनरल द्विवेदी यांनी युद्धभूमीपलीकडे लष्कराची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. लष्कर नेहमीच राष्ट्र उभारणीत आघाडीवर आहे, असे ते म्हणाले.
भारतीय लष्कराने राष्ट्र उभारणीमध्ये पुढाकार घ्यावा. आपण राष्ट्र उभारणीचा पहिला आधारस्तंभ बनले पाहिजे आणि जनतेसोबत मिळून काम केले पाहिजे, असे मत जनरल द्विवेदी यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या उत्तराखंडमधील धरली आणि थाराली तसेच अमरनाथ बचाव मोहिमांमध्ये लष्कराने केलेल्या प्रभावी बचाव कार्याचा उल्लेख त्यांनी केला. प्रत्येक जवानाने इतरांना आदर्श वाटावा, असा नेता बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जनरल द्विवेदी यांनी शारीरिक तंदुरुस्ती आणि तांत्रिक कौशल्याच्या महत्त्वावर भर दिला. प्रत्येक सैनिकाने एक निश्चित मानक गाठलेच पाहिजे, असे ते म्हणाले. जिममध्ये जाण्याची, खेळ खेळण्याची किंवा साहसी उपक्रम करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी आम्ही पर्याय खुले ठेवले आहेत. एका महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदलावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, शारीरिक तंदुरुस्ती चाचणीचे मानक समान केले गेले आहेत. पूर्वी पुरुष आणि महिलांसाठी चाचण्या वेगवेगळ्या होत्या. जेव्हा एकच लढाई लढायची आहे, तेव्हा चाचण्या वेगवेगळ्या का असाव्यात? त्यामुळे चाचण्या दोन्हीसाठी समान करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. जनरल द्विवेदी यांनी माजी सैनिकांशी बोलताना त्यांच्या निवृत्ती वेतन आणि कर्जासह सर्व समस्या, गरजांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. वरिष्ठ लष्करी नेतृत्वाने अलीकडेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रीय, राज्य आणि जिल्हा सैनिक मंडळांची भेट घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
50 वे नमन स्टेशन (कल्याण केंद्र) स्थापन करण्याची योजना आहे.
माजी सैनिकांसाठी टेलिमेडिसीन सुविधा सुरू केली आहे.
संरक्षणमंत्र्यांनी कल्याणकारी अनुदानाची रक्कम दुप्पट केली आहे.
कँटीन आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारित लाभ मिळणार आहेत.