

Indian Army celebrates Diwali : यंदाचे वर्ष हे भारतीय सैन्यासाठी आव्हानात्मक ठरले. पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला. अखेर भारतीय सैन्यदलाच्या संयमाचा कडेलोट झाला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारतीय सैनिकांनी घरात घुसून पाकिस्तानच्या नांग्याही ठेचल्या!यानंतर सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार आगळीक सुरूच राहिली; त्यालाही भारतीय जवानांनी अत्यंत धैर्याने प्रत्युत्तर दिले.आता संपूर्ण देश दिवाळीच्या आनंदोत्सवात न्हाऊन निघाला आहे. खर्या अर्थाने जीवनातील अंधार दूर करणारा हा प्रकाशोत्सव प्रत्येकजण आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवाराबरोबर द्विगुणीत आनंदाने साजरा करत आहे.याच वेळी देशाच्या सीमांवर, आपल्या घर–कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर असणारे भारतीय जवान सीमा रक्षणाचे कर्तव्य बजावत आहेत. देशभक्तीतील त्यांचे अमूल्य समर्पणच कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात रोषणाई निर्माण करते, याची सर्वांना जाणीव आहे. एकीकडे देशवासीय आपल्या आप्तस्वकीयांबरोबर दिवाळी साजरी करत असताना जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील (LOC) गोहल्लन या दुर्गम गावातील ग्रामस्थांसोबत भारतीय जवानांनी दिवाळी साजरी केली. सीमावर्ती भागातील ग्रामस्थ आणि भारतीय जवानांमधील अतूट बंध आणखी दृढ झाल्याचे यानिमित्त दिसून आले.
बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील (एलओसी) गोहल्लन या दुर्गम गावातील रहिवाशांसोबत दिवाळीची पहाट साजरी करण्यात आली. दिवे लावण्यात आले, मिठाई वाटण्यात आली आणि संपूर्ण गावात चैतन्यमय जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.जवानांबरोबर दिवाळी साजरी करताना ग्रामस्थांचा आनंद द्विगुणीत झाला, तर आपल्या कुटुंबांपासून दूर असलेल्या सैनिकांना आपुलकीचे नवे नातं लाभले.
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना ग्रामस्थांनी सांगितले,“आम्ही आमच्या खऱ्या नायकांसह दिवाळी सण साजरी करत आहोत. आम्ही कृतज्ञ आहोत. मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो.”
“आम्ही पहिल्यांदाच या सीमावर्ती भागात भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. भारतीय सैन्यही आमच्यासोबत ईद साजरी करते आणि म्हणूनच आज आम्ही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत,” असे एका ग्रामस्थाने सांगितले.