Praful Patel
नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघातात २४१ हून अधिक लोकांचा बळी गेला. या विमान अपघातानंतर माजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी सिंगापूर एअरलाइन्स (एसक्यू) च्या भूमिकेवर' प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर केवळ एअर इंडियावर शरसंधान का? असा सवाल करत या कंपनीच्या विमानांच्या देखरेखीची जबाबदारी सिंगापूर एअरलाईन्सकडे आहे, असे खासदार पटेल यांनी म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये, खासदार पटेल यांनी म्हटले आहे की, सिंगापूर एअरलाइन्स केवळ एअर इंडियामध्ये एक महत्त्वाचा भागधारक नाही तर, एअरलाइनच्या वाइड-बॉडी विमानाच्या देखभालीतही महत्त्वाची भूमिका बजावते. एअर इंडियाचे सध्याचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांना सिंगापूर एअरलाइन्सने नामनिर्देशित केले होते. त्यांनी यापूर्वी त्यांची उपकंपनी स्कूट एअरलाइन्सचे सीईओ म्हणून काम केले होते. सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियाच्या व्यवस्थापनात भूमिका आहे, शिवाय दोघांमध्ये कोडशेअर करार देखील आहे. तरीही सिंगापूर एअरलाइन्सचं मौन का? असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १८४ प्रवाशांची ओळख DNA नमुन्यांद्वारे पटली आहे.
ही तपासणी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या मदतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
१२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर भागातील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. या दुर्घटनेत २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता.