

नवी दिल्ली: रोजच्या आहारातील मिठामध्ये सोडियम क्लोराईडऐवजी काही प्रमाणात पोटॅशियम क्लोराईडचा वापर केल्यास भारतात दरवर्षी सुमारे चार लाख मृत्यू टाळता येऊ शकतात. तसेच हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या आजारांची १५ लाखांहून अधिक नवीन प्रकरणे रोखणे शक्य असल्याचा निष्कर्ष एका जागतिक संशोधनातून समोर आला आहे. 'नेचर हेल्थ' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या अभ्यासात जगातील १९३ देशांचा समावेश होता.
आहारात सोडियमचे अतिप्रमाण आणि पोटॅशियमची कमतरता ही उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे मानली जातात. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि मूत्रपिंडाचे विकार होण्याचा धोका वाढतो. नियमित मिठातील सोडियमच्या जागी पोटॅशियम क्लोराईडचा वापर केल्यास यावर उपाय करता येतो.
पोटॅशियमयुक्त मीठ दिसायला, चवीला आणि स्वयंपाकासाठी नियमित मिठासारखेच असल्याने त्याचा वापर सहज शक्य असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. मात्र प्रगत मूत्रपिंड विकार असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण वाढण्याचा धोका असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तातील पोटॅशियम वाढविणारी औषधे घेणाऱ्या रुग्णांनीही वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशा मिठाचा वापर करू नये, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
...तर २९ लाख मृत्यू टाळता येतील
जागतिक स्तरावर नियमित मिठाच्या जागी पोटॅशियमयुक्त मिठाचा वापर केल्यास दरवर्षी सुमारे २९.६ लाख मृत्यू आणि हृदय व मूत्रपिंडाच्या आजारांची एक कोटींहून अधिक नवीन प्रकरणे टाळता येऊ शकतात. घरगुती मिठात बदल केल्यास १८.५ लाख मृत्यू आणि ६२ लाख आजारांची प्रकरणे रोखता येतील.
तर प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि हॉटेलमधील अन्नामध्ये वापरल्या जाणाऱ्या मिठात बदल केल्यास १५.६ लाख मृत्यू आणि ५४.६ लाख आजारांची प्रकरणे टाळणे शक्य असल्याचा अंदाज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कमी सोडियम असलेल्या पोटॅशियमयुक्त मिठाच्या पर्यायांचा वापर करण्याची शिफारस केली आहे.