आमदार, मंत्री आणि आता CM! 'ऑक्सफोर्ड'मध्ये शिकलेल्या आतिशी कोण आहेत?

Atishi Marlena | जाणून घ्या अतिशी मार्लेना यांचा राजकीय प्रवास
Atishi Marlena
जाणून घ्या आतिशी मार्लेना यांचा राजकीय प्रवास file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या राजकारणात अनेकांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. त्यांच्या नावाला विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पंजाबी राजपूत कुटुंबातून आलेल्या आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीधर असलेल्या आतिशी यांच्याबद्दल जाणून घेऊया...

आतिशी यांचा राजकीय प्रवास

आतिशी (Atishi Marlena) यांचा जन्म ८ जून १९८१ रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील नामविजय सिंह हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आतिशी यांचे शालेय शिक्षण स्प्रिंगडेल स्कूल नवी दिल्ली येथे झाले. त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून चेव्हनिंग स्कॉलरशिपवर पदव्युत्तर पदवी मिळवली. काही वर्षांनी त्यांनी ऑक्सफर्डमधून शैक्षणिक संशोधनात रोड्स स्कॉलर म्हणून दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी मध्य प्रदेशातील एका गावात सात वर्षे सेंद्रिय शेती आणि प्रगतीशील शिक्षण प्रणालींमध्ये अभ्यास केला. तिथे अनेक संस्थांसोबत त्यांनी काम केले आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. तिथेच त्या प्रथम काही आप पक्षाच्या सदस्यांना भेटल्या होत्या.

२०२० मध्ये आतिशी (Atishi Marlena) पहिल्यांदाच कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. त्यांनी भाजपचे उमेदवार धरमवीर सिंह यांचा ११ हजार ३९३ मतांनी पराभव केला. २०२३ मध्ये पहिल्यांदा त्यांना केजरीवाल सरकारमध्ये मंत्री पदाची संधी मिळाली. अवघ्या एका वर्षानंतर २०२४ मध्ये त्या मुख्यमंत्री होणार आहेत. यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये पूर्व लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली होती. भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्याकडून ४.७७ लाख मतांनी त्या पराभूत झाल्या होत्या. आतिशी या केजरीवाल यांच्या जवळच्या सहकारी आणि विश्वासू मानल्या जातात. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या काळापासून त्या संघटनेत सक्रिय आहेत. सध्या त्यांच्याकडे बहुतांश मंत्रालयांची जबाबदारी आहे. मार्चमध्ये केजरीवाल तुरुंगात गेल्यापासून त्या पक्षापासून ते सरकारपर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर पुढाकार घेताना दिसत आहेत.

'आप'ची धोरणे राबवण्यात मोठी भूमिका

आतिशी (Atishi Marlena) या २०१३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनामा मसुदा समितीच्या प्रमुख सदस्या होत्या. पक्षाच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पक्षाची धोरणे तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून आतिशी यांनी आपली बाजू मोठ्या ताकदीने मांडली. केजरीवाल यांच्याप्रमाणे त्या मनीष सिसोदिया यांच्याही जवळच्या मानल्या जातात. त्यांनी सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणूनही काम केले आणि त्यांच्या अनुपस्थितीत शिक्षण मंत्रालय सांभाळले.

Atishi Marlena
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा नवीन चेहरा ठरला, आतिशींच्या नावावर शिक्कामोर्तब

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news