PM Vidyalaxmi Scheme | पीएम विद्यालक्ष्मी योजना : शिक्षणासाठी ‘गारंटी-फ्री’ लोन, व्याजातही सवलत !

आता हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीशिवाय (बिना गॅरंटी) शिक्षण कर्ज मिळवणे सोपे झाले आहे.
PM Vidyalaxmi Scheme
PM Vidyalaxmi SchemePudhari Photo
Published on
Updated on

Education Loan PM Vidyalaxmi Scheme update

नवी दिल्ली : उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या, पण आर्थिक परिस्थितीमुळे मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक आशेचा किरण आणला आहे. ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजने’च्या माध्यमातून आता हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीशिवाय (बिना गॅरंटी) शिक्षण कर्ज मिळवणे सोपे झाले आहे.

6 नोव्हेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळाकडून मंजुरी

इतकेच नाही, तर विशिष्ट परिस्थितीत सरकारकडून शैक्षणिक कर्जावरील व्याज देखील माफ केले जाणार आहे. ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळणार आहे. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. 6 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्राच्या मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली. अनेक हुशार विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडतात. अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक नवी संधी घेऊन आली आहे.

काय आहे प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना?

देशातील कोणताही पात्र विद्यार्थी केवळ पैशांअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. अनेकदा आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक नवी संधी आणि नवी उमेद घेऊन आली आहे. या योजनेअंतर्गत, एकाच पोर्टलवर विविध बँकांच्या शिक्षण कर्ज योजनांची माहिती आणि अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे

हमीशिवाय कर्ज : देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये (QHEIs) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही जामीनदाराशिवाय किंवा तारणाशिवाय (गॅरंटी/सिक्युरिटी) शिक्षण कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

सरकारी क्रेडिट गँरंटी : ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकार ७५% क्रेडिट गॅरंटी देते, ज्यामुळे बँकांना कर्ज देणे सोपे होते.

व्याजदरात मोठी सवलत : या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे व्याजदरात मिळणारी मोठी सवलत.

कर्ज परतफेडीसाठी मुदत : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कर्ज परतफेडीसाठी १५ वर्षांपर्यंतची मुदत दिली जाते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीपर्यंत (Moratorium Period) व्याज सवलतीचा लाभ मिळतो.

व्याज सवलत कशी मिळणार?

ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना कर्जावरील १००% व्याज माफ केले जाते.

ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना १० लाखांपर्यंतच्या कर्जावर ३% व्याज सवलत मिळते.

PM Vidyalaxmi Scheme
PM Vidyalaxmi SchemePudhari Photo

अर्ज कसा करावा?

विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि सोपी आहे:

स्टेप 1: www.vidyalakshmi.co.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन "Student Login" वर क्लिक करा. नवीन खाते तयार करा.

स्टेप 2 - नोंदणी : नाव, मोबाईल नंबर, ईमेल टाका, OTP द्वारे खात्री करा. पासवर्ड सेट करा.

स्टेप 3 - लॉगिन आणि अर्ज : लॉगिन केल्यानंतर "Apply for Education Loan" वर क्लिक करा. फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.

स्टेप 4 - माहिती भरा : अर्जामध्ये तुमची वैयक्तिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक माहिती अचूकपणे भरा. तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज हवे आहे, ती बँक निवडा.

स्टेप 5 - कागदपत्रे अपलोड करा : आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि अर्ज अंतिमरित्या सबमिट करा.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड

  • १०वी आणि १२वीची गुणपत्रिका

  • रहिवासाचा पुरावा

  • शिक्षण संस्थेतील प्रवेशाचे पत्र (Admit Card) आणि फी स्ट्रक्चर

  • कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला

योजनेचा लाभ कोणाला  मिळणार नाही?

मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. केवळ गुणवत्ता किंवा प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश मिळालेले विद्यार्थीच पात्र आहेत.

जे विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात (वैद्यकीय कारणे वगळता) किंवा शिस्तभंगाच्या कारवाईमुळे संस्थेतून काढून टाकले जातात, ते अपात्र ठरतात.

थोडक्यात, प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही उच्च शिक्षणाची इच्छा असणाऱ्या पण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या योजनेमुळे आता पैशांची चिंता न करता विद्यार्थी आपल्या करिअरच्या स्वप्नांना पंख देऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news