

PM Modi Ghana Vist :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' ने सन्मानित करण्यात आले आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये चार वेगवेगळ्या सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या झाल्या. भारत आणि घाना मिळून मानवतेचा शत्रू असलेल्या दहशतवादाविरोधात एकत्र काम करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
सर्वोच्च सन्मानाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "घानाकडून सन्मानित होणे ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. भारत आणि घाना दहशतवादाला मानवतेचा शत्रू मानतात आणि त्याविरोधात एकत्रितपणे लढा देतील. ही युद्धाची वेळ नसून, चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून समस्या सोडवल्या पाहिजेत. तत्पूर्वी, त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांच्यासोबत संयुक्त निवेदन जारी केले. दोन्ही देश संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) सुधारणा करण्यावर एकमत आहेत. त्याचबरोबर, पश्चिम आशिया आणि युरोपमधील सुरू असलेल्या संघर्षांवर दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली.
"भारत आणि घाना यांच्यातील व्यापार २५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असून, पुढील ५ वर्षांत तो दुप्पट करण्याचे आमचे लक्ष्य आहे." असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. तसेच घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले.
भारत घानाला फिनटेक क्षेत्रात सहकार्य करेल आणि UPI द्वारे डिजिटल व्यवहारांचा अनुभव सामायिक करेल. भारत घानाच्या तरुणांसाठी ITEC आणि ICCR शिष्यवृत्तींची संख्या दुप्पट करणार आहे. भारत घानाच्या लष्करी प्रशिक्षणात, सागरी सुरक्षेत, संरक्षण साहित्य पुरवठ्यात आणि सायबर सुरक्षेत सहकार्य करेल. लस निर्मिती, संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रांत मदत करण्याबरोबरच सायबर सुरक्षेतील परस्पर सहकार्यही वाढवणे घानाच्या तरुणांच्या व्यावसायिक शिक्षणासाठी एक कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे .भारत 'जन औषधी केंद्रां'च्या माध्यमातून घानाच्या लोकांना स्वस्त आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा पुरवेल, अशी ग्वाहीही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली. यावेळी दोन्ही देशांनी चार महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या केल्या. या करारांमुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव दम्मू रवी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आफ्रिकन देश घाना येथे दाखल झाले. राजधानी अक्रा येथील विमानतळावर घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींना २१ तोफांची सलामी देत 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.यानंतर मोदी हॉटेलमध्ये पोहोचले, जिथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. हॉटेलबाहेर भारतीय वेशभूषेत आलेल्या शाळकरी मुलांनी मोदींना संस्कृतमध्ये श्लोक ऐकवले. त्यानंतर त्यांनी घानाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत राजधानी अक्रामधील 'जुबली हाऊस'मध्ये द्विपक्षीय चर्चा केली.