

पुढारी ऑनलाईन डेस्क : Narendra Modi on Union Budget 2025 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा आणि प्रत्येक भारतीयाचे स्वप्न पूर्ण करणारा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली. (Budget 2025)
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारी सुरुवात झाली. मोदी सरकारच्या ऐतिहासिक तिसर्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शनिवारी मांडला. संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा जनतेचा अर्थसंकल्प आहे. भारताच्या विकासामध्ये आजचा दिवस एक महत्त्वाचा टप्पा आहे. १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्ने पूर्ण करणारे बजेट आहे. तरुणांसाठी अनेक क्षेत्रे खुली केली आहेत. हे विकसित भारताच्या ध्येयाला चालना देणारे एक शक्ती गुणक बजेट आहे. आजच्या अर्थसंकल्पाने भारतात गुंतवणुकीला, पर्यटनाला चालना मिळेल. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी झालेल्या घोषणा कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भागात क्रांती घडवेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. (Budget 2025)