

PM Narendra Modi Creates History: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. येत्या १० जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही पद्धतीनं निवडून आलेले भारताचे सर्वात जास्त काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते बनणार आहेत. ते भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकणार आहेत.
नरेंद्र मोदी यांनी पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान पदाची शपथ २६ मे २०१४ रोजी घेतली होती. आता ते १० जून रोजी पंतप्रधान म्हणून ४३९९ दिवस पूर्ण करणार आहेत. ते पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सर्वाधिक दिवस (४३९८) पंतप्रधान पद भूषवण्याचा विक्रम मागे टाकणार आहेत. जवाहरलाल नेहरू यांनी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर म्हणजेच १३ मे १९५२ रोजी शपथ घेतली होती. त्यांचा मृत्यू २७ मे १९६४ रोजी झाला होता. तोपर्यंत ते भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते.
नरेंद्र मोदी हे राजकीय कारकिर्दीत अजून एक माईल स्टोन गाठणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच इंदिरा गांधी यांचा सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम मोडला आहे. हा विक्रम त्यांनी २५ जुलै २०२५ मध्येच मोडला. इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ पासून २४ मे १९७७ पर्यंत ४०७७ दिवस सलग पंतप्रधानपद भूषवलं होतं.
ज्यावेळी पंडित नेहरू यांनी देशाचे नेतृत्व केले त्यावेळी भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. त्यावेळी भारताची लोकसंख्या ही ३४ कोटी होती. ज्यावेळी नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी भारताची लोकसंख्या ही १३१ कोटींच्या पार गेली होती. आतापर्यंत ही लोकसंख्या १४६ कोटींच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
राजकीयदृष्ट्या पाहिलं तर ज्यावेळी भारतात १९५१-५२ मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाली होती त्यावेळी ५३ राजकीय पक्षांनी यात सहभाग नोंदवला होता. २०१४ मध्ये राजकीय पक्षांची संख्या ४६४ झाली असून आता २०२४ मध्ये ती ७४४ पर्यंत पोहचली आहे. पहिल्या निवडणुकीत १७ कोटी मतदार होते. २०१४ मध्ये त्यांची संख्या ८३ कोटींवर पोहचली आहे.
राजकीय परिस्थिती देखील दोन्ही काळात अत्यंत भिन्न होती. नेहरू बलाढ्य काँग्रेस पक्षाकडून राजकारण करत होते. त्यांच्या पक्षाने १९५२ मध्ये ४८९ पैकी ३६४ जागा जिंकल्या होत्या. मात्र नरेंद्र मोदी यांच्या काळात राजकारण अत्यंत स्पर्धात्मक झालं आहे. स्थानिक पक्ष बळकट आहेत. प्रत्येक राज्यात आघाड्यांचे अस्तित्व असल्यानं राजकीय आव्हाने देखील तगडी आहेत.
विशेष म्हणजे नरेंद्र मोदी हे काँग्रेस व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचे असे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी पंतप्रधान पदाचे दोन कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. याचबरोबर ते माजी पंतप्रधान नेहरूंनंतर सलग तीन लोकसभा निवडणूक जिंकणारे पहिलेच पंतप्रधान आहेत.