

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jammu-Kashmir Z-Mor tunnel Sonmarg | जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन केले. या बोगद्याच्या बांधकामानंतर लडाखला जाणे आणि तेथून प्रवास करणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. श्रीनगर ते कारगिल-लेह हा मार्गही आता वर्षभर खुला राहील. हा बोगदा भारतीय सैन्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे हा महामार्ग बंद राहणार नाही. त्यामुळे सैन्य वर्षभर या बोगद्याचा वापर करून सीमावर्ती भागात पोहोचू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुप्रतिक्षित सोनमर्ग बोगद्याचे सोमवारी उद्घाटन केले. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि डॉ. जितेंद्र सिंह, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि इतर अधिकारी होते. कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी यांनी बोगद्याला भेट दिली.
श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर सोनमर्ग आणि गगनगीरला जोडणारा हा बोगदा ८,६५० फूट उंचीवर आहे. झेड आकारात बांधलेला हा बोगदा ६.५ किमी लांबीचा आहे. आपत्कालीन परिस्थितीत ७.५ मीटर रुंद समांतर मार्ग आहे. गगनगीर आणि सोनमर्गमधील अंतर सुमारे ६ किमीने कमी झाले आहे. पूर्वी हे अंतर कापण्यासाठी एक तास लागत होता, पण आता ते १५ मिनिटांपर्यंत कमी होईल. हा बोगदा वर्षभर लडाखला रस्त्याने जोडेल आणि देशाच्या संरक्षण गरजा आणि प्रादेशिक विकासातही महत्त्वाची भूमिका बजावेल.
सोनमर्ग बोगद्यामुळे गगनगीर ते सोनमर्ग पर्यंत वाहतूक होईल.
राष्ट्रीय महामार्ग-१ वरील प्रवासाचे अंतर ४९ किमी वरून ४३ किमी पर्यंत कमी होईल.
वाहनांचा वेग ३० किमी/ताशी वरून ७० किमी/ताशी होईल.
या बोगद्यामुळे परिसरातील पर्यटन आणि व्यवसाय वाढण्यास मदत होईल.
लडाख प्रदेशाला काश्मीर खोऱ्याशी जोडण्यासाठीही हा बोगदा उपयुक्त ठरेल. हा बोगदा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो उन्हाळा आणि हिवाळ्यात या प्रदेशाला जोडण्यासाठी महत्त्वाचा आहे. झेड-मोर बोगद्यामुळे पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना प्रवास सुलभ होईल, तसेच लडाख प्रदेशाला काश्मीर खोऱ्याशी जोडण्यास मदत होईल. हा प्रकल्प या प्रदेशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.