

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या भूमिकेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि आक्रमक हल्ला चढवला. ‘काँग्रेसकडे राष्ट्रीय सुरक्षेसाठी ना कधी दूरदृष्टी होती, ना आज आहे. त्यांनी नेहमीच देशाच्या सुरक्षेशी तडजोड करून देशाची पवित्र भूमी शत्रूंना थाळीत सजवून दिली,’ अशा घणाघाती शब्दांत मोदींनी काँग्रेसच्या इतिहासाची लक्तरे वेशीवर टांगली. पाकव्याप्त काश्मीर (PoK) पासून ते अक्साई चीनपर्यंत आणि कच्छच्या रणापासून ते कच्चाथीवू बेटापर्यंत, काँग्रेसच्या प्रत्येक सरकारच्या काळात देशाने आपली जमीन आणि सामरिक महत्त्व कसे गमावले, याचा सविस्तर पाढाच मोदींनी वाचला.
मोदींनी आपल्या टीकेची सुरुवात सर्वात जुन्या आणि संवेदनशील मुद्द्यावरून केली. ते म्हणाले, ‘आज लोक विचारतात की पीओके परत का घेतला नाही. पण त्यांना उत्तर द्यावे लागेल की पाकिस्तानला पीओकेवर कब्जा करण्याची संधी कोणाच्या सरकारने दिली? उत्तर स्पष्ट आहे. जेव्हा जेव्हा मी नेहरूजींबद्दल बोलतो, तेव्हा काँग्रेस आणि त्यांची संपूर्ण इकोसिस्टम अस्वस्थ होते. यामागचे कारण काय आहे, हे मला कळत नाही.’ नेहरूंच्या काळातच भारताने काश्मीरचा एक मोठा भाग गमावला, असा थेट आरोप मोदींनी केला.
मोदींनी १९६२ च्या युद्धाच्या जखमांवरची खपली काढताना काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘संपूर्ण अक्साई चीन परिसराला ‘ओसाड जमीन’ म्हणून घोषित करण्यात आले आणि देशाने तब्बल ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन गमावली. मला माहित आहे की माझे काही शब्द दुखावणारे आहेत, पण सत्य कटू असते.’’ देशाच्या भूभागाकडे पाहण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन किती बेफिकीर होता, हे यातून स्पष्ट होते, असे मोदींनी नमूद केले.
काँग्रेसने केवळ चुकाच केल्या नाहीत, तर देशाची भूमी शत्रूंना देण्याचे प्रस्तावही दिले होते, असा गंभीर आरोप मोदींनी केला. त्यांनी काही ऐतिहासिक घटनांचा उल्लेख केला.
१९६२-६३ : काँग्रेसचे नेते शांततेच्या नावाखाली जम्मू-काश्मीरमधील पूंछ, उरी आणि किशनगंगासारखे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे भाग सोडून देण्याचा प्रस्ताव देत होते.
१९६६ : कच्छच्या रणावरील आंतरराष्ट्रीय लवाद काँग्रेसने स्वीकारला, ज्यात भारताला मोठा भूभाग गमवावा लागला.
१९६५ : भारतीय सैन्याने पराक्रम गाजवून हाजी पीर खिंड जिंकली होती, पण काँग्रेस सरकारने ताश्कंद करारामध्ये ती पुन्हा पाकिस्तानला परत केली.
१९७१ च्या युद्धात भारताच्या ऐतिहासिक विजयानंतरही काँग्रेसने एक मोठी संधी गमावल्याचा ठपका मोदींनी ठेवला. "आपल्या ताब्यात पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक युद्धकैदी म्हणून होते. आपण त्यावेळी खूप काही मिळवू शकलो असतो. जर तेव्हा थोडा समजूतदारपणा दाखवला असता, तर आज चित्र वेगळे असते. पण ती संधी हुकली. किमान ते शीख बांधवांसाठी पवित्र असलेले करतारपूर साहिब तरी घेऊ शकले असते, पण तेही त्यांना जमले नाही," अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसच्या मुत्सद्देगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
मोदींनी १९७४ मध्ये काँग्रेस सरकारने कच्चाथीवू बेट श्रीलंकेला दिल्याचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, "तामिळनाडूच्या मच्छिमारांचा काय गुन्हा होता की तुम्ही भारताचे बेट श्रीलंकेला भेट दिले? यामुळे आजही आपले मच्छिमार त्रास सहन करत आहेत."
मोदींनी काँग्रेसच्या पाकिस्तानविषयक धोरणावरही जोरदार प्रहार केला. "एकीकडे पाकिस्तान भारतात रक्ताची होळी खेळण्यासाठी दहशतवादी पाठवत होता आणि दुसरीकडे काँग्रेस सरकार शांततेच्या आशेने इथे मुशायरे भरवत होते. पाकिस्तान पुरस्कृत मोठे दहशतवादी हल्ले देशावर होत राहिले, पण काँग्रेसने पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा कधीही मागे घेतला नाही," असा आरोप मोदींनी केला.
आपल्या सरकारने हे चित्र पूर्णपणे बदलल्याचे मोदींनी ठामपणे सांगितले. "दहशतवादाची ही एकेरी वाहतूक आम्ही थांबवली. आम्ही पाकिस्तानचा 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा रद्द केला, व्हिसा बंद केला आणि अटारी-वाघा सीमेवरील व्यापार थांबवला. आता जशास तसे उत्तर दिले जाते," असे म्हणत मोदींनी आपल्या सरकारच्या कणखर भूमिकेचे दर्शन घडवले.
थोडक्यात, पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून काँग्रेसला केवळ निवडणुकीच्या राजकारणातच नव्हे, तर इतिहासाच्या न्यायालयातही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर काँग्रेसची भूमिका ही दूरदृष्टीचा अभाव, अक्षम्य चुका आणि देशहिताशी केलेल्या तडजोडींची एक लांबलचक मालिका होती, असा थेट आरोप मोदींनी केला आहे. या टीकेमुळे आगामी काळात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा राजकीय पटलावर आणखी तापणार, हे निश्चित.