

पुढारी ऑनलाईन डेस्क : विक्रांत मेसी स्टारर 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. गोध्रा हत्याकांडावर आधारित या चित्रपटाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. पीएम मोदी यांनी एक्स पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले असून, ‘जे सत्य असते ते नेहमीच बाहेर येते,’ अशी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया नोंदवली आहे. (pm narendra modi sabarmati report film)
पीएम मोदींनी X (पूर्वीच्या ट्विटर) वर म्हटले आहे की, खोट्या गोष्टी फार काळ टिकू शकत नाहीत. शेवटी सत्य बाहेर येतेच.
‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट 15 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने गोध्रा हत्याकांडाची घटना पुन्हा एकदा चर्चेत आणली आहे. चित्रपटात विक्रांत मेसी, रिद्धी डोगरा आणि राशी खन्ना हे स्टार मुख्य भूमिकेत आहेत.
पंतप्रधानांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये चित्रपटाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट का पाहावा असा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. यावर प्रकाश टाकत पोस्टमध्ये चार मुद्दे मांडले आहेत.
1. हा प्रयत्न विशेषतः प्रशंसनीय आहे. कारण आपल्या अलीकडील इतिहासातील सर्वात लज्जास्पद घटनांपैकी एक महत्त्वाचे सत्य ते समोर आणते.
2. निर्मात्यांनी चित्रपटाची निर्मिती प्रामाणिकपणे केली आहे. चित्रपटाचे कथानक आणि त्यातील मुद्दे अतिशय संवेदनशीलतेने मांडले आहेत.
3. साबरमती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना कसे जाळले, एका समुहाने त्या घृणास्पद घटनेला राजकीय रंग कसा दिला, या आणि इतर महत्त्वाच्या बाबींचा सखोल विचार करणे आपल्या सर्वांसाठी फायदेशीर आहे. त्या विशिष्ट समुहाच्या इको सिस्टीमने निव्वल खोटेपणा पसरवचे काम केले. आपला अजेंडा ठरवण्यासाठी त्यांनी एकामागून एक खोटे बोलण्यास सुरुवात केली.
‘साबरमती रिपोर्ट’ 2002 मध्ये झालेल्या गोध्रा रेल्वे हत्याकांडावर आधारित आहे, ज्यात 59 जणांचा मृत्यू झाला होता. गोध्रा रेल्वे हत्याकांड घटनेतील सत्य दाखवण्याचा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. चित्रपटात एक हिंदी पत्रकार (विक्रांत मेसी) गोध्रा घटनेशी संबंधित महत्त्वाची तथ्ये त्याच्या वृत्तवाहिनीला देतो. पण एक इंग्रजी जाणणारा पत्रकार कथा बदलण्यासाठी चॅनल मालकासोबत डील करतो. सत्य लपवून खोटा नरेटीव्ह कसा सेट केला जातो, या मागची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’ रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत होता. चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरना यांनी केले आहे. झी स्टुडिओजच्या बॅनरखाली एकता कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाने पहिल्या दोन दिवसात 3.35 कोटींचा व्यवसाय केला आहे.