

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशचतुर्थी दरम्यान सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांच्या घरी गणरायाच्या दर्शन निमित्त भेट दिली. या प्रसंगानंतर न्यायाव्यवस्था सत्ताधारी सरकारच्या हातात आहे, अशी टीका विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केली होती. या मुद्द्यावरून बराच राजकीय वाद झाला.आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या प्रसंगावर स्पष्टीकरण दिले आहे.
गणेशोत्सव पूजेदरम्यानदरम्यान पीएम नरेंद्र मोदींचे CJI डी. वाय. चंद्रचूड यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यानंतर न्याय व्यवस्थेला सरकारपासून वेगळे ठेवण्याच्या गरजेवरून बराच वाद झाला. अनेकांनी चंद्रचूड यांच्यावर टीका केली. त्यांच्या निष्पक्ष राहण्याच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश डी. वाय चंद्रचूड यांनी पीएम मोदींच्या पूजन भेटीबद्दल उघडपणे बोलताना सांगितले की, ' या भेटीदरम्यान आमच्यात न्यायिक प्रकरणांवर कधीही चर्चा झाली नाही'.
"आम्हाला लोकशाही, शासन व्यवस्थेतील आमची कर्तव्ये माहीत आहेत आणि राजकीय कार्यकारिणीला त्यांची कर्तव्ये माहीत आहेत. कोणताही न्यायाधीश, त्यापैकी किमान भारताचे सरन्यायाधीश तरी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी वास्तविक किंवा समजलेल्या कोणत्याही धोक्याला दूरस्थपणे आमंत्रित करू शकत नाहीत", असेही CJI डी. वाय. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे.