

पुढारी ऑनलाईन डेस्क : Waqf Amendment Bill | संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ दुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर झाले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहेत. हे विधेयक दीर्घकाळापासून सामाजिकदृष्या दुर्लक्षित, ज्यांचा आवाज आणि संधी दोन्ही नाकारल्या जाणाऱ्या लोकांना मदत करेल, असेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या एक्स सोशल मीडिया अकाऊंटवरून केली आहे.
जवळपास बारा तासांच्या वादळी चर्चेनंतर गुरुवारी मध्यरात्री वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेत बहुमताने मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 सदस्यांनी मतदान केले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या सर्व सूचना फेटाळण्यात आल्या. दरम्यान, बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाली होती. आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
पुढे पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, आपण आता अशा युगात प्रवेश करणार आहोत जिथे चौकट अधिक आधुनिक आणि सामाजिक न्यायासाठी संवेदनशील असेल. मोठ्या प्रमाणात, प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यास आपण वचनबद्ध आहोत. अशाप्रकारे आपण एक मजबूत, अधिक समावेशक आणि अधिक दयाळू भारत निर्माण करत असल्याचेदेखील ते म्हणाले.
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक मंजूर केल्याने सामाजिक-आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि समावेशक विकासाच्या आपल्या सामूहिक प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण आहे. गेल्या अनेक दशकांपासून वक्फ व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव होता. यामुळे विशेषतः मुस्लिम महिला, गरीब मुस्लिम, पसमांदा मुस्लिमांच्या हिताचे नुकसान झाले. संसदेने मंजूर केलेले कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्कांचे रक्षण करतील, असेदेखील पंतप्रधानांनी म्हटले आहे.