

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेने अनेक देशांवर टॅरिफ लागू केले आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेस्ला, एक्स कंपन्यांचे मालक एलन मस्क यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पीएम मोदींनी स्वतः X वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "त्यांनी मस्क यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्यांच्या भेटीदरम्यान ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली, तेच मुद्दे फोनवर बोलताना पुन्हा चर्चेत आले".
पुढे PM मोदी यांनी म्हटले आहे की, "मी एलन मस्क यांच्याशी बोललो. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या आमच्या बैठकीत आम्ही ज्या विषयांवर चर्चा केली त्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य कसे वाढवायचे यावर विचारमंथन झाले. भारत आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात सहकार्याच्या अफाट शक्यतांवर मस्क आणि त्यांच्यात चर्चा झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या क्षेत्रांमध्ये अमेरिकेसोबतची भागीदारी आणखी वाढवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे".
फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेचे अब्जाधिश उद्योगपती एलन मस्क यांनादेखील भेटले होते. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या आधीही मस्क यांना भेटले. या प्रकरणाची माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी विशेषतः एलन मस्क यांच्या मुलांशी संवाद करताना दिसले होते. यावेळी दोघांमध्ये नवोन्मेष, अवकाश संशोधन आणि टेस्लाच्या विस्तार योजनांवर चर्चा झाली होती.
मस्क यांची टेक कंपनी टेस्ला भारतात प्रवेश मिळवण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर टेस्लाचे अधिकारी लवकरच भारतात येतील. एलन मस्क यांच्या टेस्लाला आयात शुल्कात सूट मिळविण्यासाठी भारत सरकारच्या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. यासोबतच, सरकारी सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाला तर, टेस्लाने उत्पादनासाठी गुजरातसह महाराष्ट्रातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगर हे आवडते ठिकाण म्हणून निवडले आहे. एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतात ३ ते ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करू शकते, असे देखील मानले जाते.