

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नारीशक्ती'ला मान दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपले सोशल मीडिया हँडल्स एका दिवसासाठी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांच्या हाती सोपवले आहे.
पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमात महिला दिनाच्या दिवशी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट प्रेरणादायी महिलांना सोपवतील असे सांगितले होते. आज एक्स'वर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "महिला दिनाच्या दिवशी (Womens Day) आम्ही आमच्या नारीशक्तीला वंदन करतो. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आमचे सरकार नेहमीच कार्यरत आहे आणि ते आमच्या विविध योजनांमध्ये दिसून येते. वचन दिल्याप्रमाणे आज माझे सोशल मीडिया हँडल्स विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांकडून सांभाळले जाईल."
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया हँडल्सची जबाबदारी विविध क्षेत्रांत चमकणाऱ्या महिलांना देण्यात आली. यामध्ये बुद्धिबळ ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू हिनेही सहभाग घेतला. तिने महिला ग्रँड स्विस स्पर्धा 2023 जिंकली आहे. पंतप्रधानांच्या एक्स हँडलवरून पोस्ट करत वैशालीने ही जबाबदारी स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया हँडल्सची जबाबदारी घेताना मला खूप अभिमान आणि आनंद होत आहे. मी बुद्धिबळ खेळते आणि भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे," असे तिने म्हटले. तिने विशेषतः पालकांना मुलींना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून आणखी दोन महिला वैज्ञानिकांनीही पंतप्रधानांचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळले. अणुशास्त्रज्ञ एलिना मिश्रा आणि अंतराळ शास्त्रज्ञ शिल्पी सोनी यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील महिलांचे योगदान अधोरेखित केले. "भारत हे विज्ञानासाठी सर्वात चैतन्यशील ठिकाण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रात पुढे यावे," असे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले.