Arvind Kejriwal : पंतप्रधान मोदींना आम आदमी पक्ष संपवायचा आहे : अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र )
अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाला घेराव घालून धरणे आंदोलन केले. मात्र, दिल्ली पोलिसांकडून परवानगी न मिळाल्याने काही काळानंतर ते माघारी परतले. आंदोलनस्थळावरून परतण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आम आदमी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन झाडू सुरू केले असून त्यांना आम आदमी पक्ष संपवायचा आहे, असा आरोप यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केला. अरविंद केजरीवाल आपल्या सहकाऱ्यांसह भाजप मुख्यालयात जाणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांना मध्येच अडवले, ज्या ठिकाणी त्यांना अडवण्यात आले त्याच ठिकाणी त्यांनी धरणे प्रदर्शन सुरू केले.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांना जाणीवपूर्वक तुरुंगात टाकले जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी ते भाजप कार्यालयाकडे येत होते. कालच अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. केजरीवाल म्हणाले, "मिशन झाडू अंतर्गत 'आप' नेत्यांवर कारवाई केली जात आहे. भाजप ऑपरेशन झाडू चालवत आहे. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केले जात आहे, असेही ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल आपल्या सहकाऱ्यांसह दुपारी बाराच्या सुमारास आम आदमी पक्षाच्या मुख्यालयातून भाजप मुख्यालयाकडे निघाले. यावेळी पोलिसांनी त्यांना भाजप मुख्यालय असलेल्या दीनदयाल उपाध्याय मार्गावर रोखले. त्याच ठिकाणी केजरीवाल यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर भाषण केले. केजरीवाल म्हणाले की, "निवडणुकीनंतर आपची बँक खाती गोठवण्यात येतील. पंतप्रधान मोदी आणि भाजपचा आम आदमी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न आहे. यासाठी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन झाडू तयार केले आहे."

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून अरविंद केजरीवाल म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी रोज तुरुंगाचा खेळ खेळणे बंद करावे. आम्ही तुमच्या कार्यालयात पोहोचलो आहोत. संपूर्ण आम आदमी पक्षाला एकत्र अटक करा. तसेच आगामी काळात आम आदमी पक्ष अनेक राज्यांमध्ये भाजपसाठी आव्हान बनू शकतो, त्यामुळे हा पक्ष तात्काळ संपवावा, असे पंतप्रधानांना वाटते, असेही केजरीवाल म्हणाले.

भाजप मुख्यालय परिसरात कलम १४४ लागू

'मी माझ्या सहकाऱ्यांसह भाजप मुख्यालयात जाणार,' अशी माहिती कालच अरविंद केजरीवाल यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था भाजप कार्यालय परिसरात उभारण्यात आली होती. भाजप मुख्यालय असलेल्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले होते. असे असतानाही अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप कार्यालयाकडे कूच केली.

दरम्यान, अरविंद केजरीवाल आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते भाजप मुख्यालयाजवळ पोहोचत असताना या ठिकाणी १४४ कलम लागू आहे, अतिरिक्त गर्दी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला होता. यावेळी आम आदमी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि काही वेळानंतर सोडून दिले.

केजरीवाल यांच्यासोबत आपचे हे नेते होते उपस्थित

अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यालयातून भाजप कार्यालयाकडे कूच केली तेव्हा त्यांच्यासोबत पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांच्यासह खासदार संजय सिंह, खासदार राघव चढा, संदीप पाठक, दिल्ली सरकारमधील मंत्री अतिशी, सौरभ भारद्वाज, दिल्ली प्रदेशाध्यक्ष गोपाल राय आणि सर्व प्रमुख नेते उपस्थित होते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news