

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीमधील भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयानंतर राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान भावूक झाले होते. "तुम्ही कमाल केलीत, कमळ फुलवले आणि एक नवा इतिहास रचला आहे. जेव्हा अनेक वर्षांची तपश्चर्या सिध्दीमध्ये रूपांतरित होते, तेव्हा जो आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहतो, तोच आनंद आज मला देशभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधानांनी या विजयाचा संबंध भौगोलिक आणि आध्यात्मिक संदर्भांशी जोडत विरोधकांना सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, "गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा बिहार निवडणुकीचे निकाल आले होते, तेव्हा मी म्हटले होते की गंगा नदी बिहारमधून पुढे वाहत गंगासागरपर्यंत जाते. आज बंगालमधील विजयानंतर गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत सर्वत्र कमळच कमळ फुललेले दिसत आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता पश्चिम बंगाल; गंगा मातेच्या तीरावर वसलेल्या या सर्व राज्यांमध्ये आज भाजपप्रणीत एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे."
बंगालमधील विक्रमी मतदानावर भाष्य करताना मोदींनी याला लोकशाहीचा विजय असल्याचे सांगितले. "आज केवळ भारताची लोकशाही जिंकलेली नाही, तर संविधानाचाही विजय झाला आहे. आपल्या घटनात्मक संस्था आणि लोकशाही प्रक्रियांचा विजय झाला आहे. बंगालमध्ये ९३ टक्के मतदान होणे ही बाब ऐतिहासिक आहे. आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्येही मतदानाचे नवे विक्रम प्रस्थापित झाले आहेत. यामध्ये महिलांचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय असून, ही भारतीय लोकशाहीची सर्वात उज्ज्वल बाजू आहे," असे सांगत त्यांनी निवडणूक आयोग, कर्मचारी आणि सुरक्षा दलांचे विशेष अभिनंदन केले.
देशातील राजकीय स्थितीचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, आज देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये भाजप आणि एनडीएची सरकारे आहेत. 'नागरिक देवो भवः' हा आमचा मूलमंत्र असून आम्ही केवळ जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहोत. जिथे भाजप आहे तिथे सुशासन आणि विकास आहे, हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे आणि म्हणूनच त्यांचा आमच्यावरील विश्वास वृद्धिंगत होत आहे. २०२१ मध्ये आम्ही पुडुचेरीच्या जनतेसमोर 'सर्वोत्कृष्ट पुडुचेरी'चा जो संकल्प मांडला होता, त्यावर जनतेने विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा एनडीएला आपला आशीर्वाद दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
जानेवारी २०२६ मध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या निवडणुका ही नितीन नवीन यांच्यासाठी पहिली परीक्षा होती. कारण नवे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या जाणार होत्या. ही परीक्षा नितीन नवीन यांनी अतिशय चांगल्या गुणांसह उत्तीर्ण केली आहे.
सोमवारी आलेल्या निकालांमध्ये पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपला सत्ता मिळवता येणार आहे. तर आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल आणि भाजपप्रणित एनडीए पुदुच्चेरी मध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. तमिळनाडूमध्ये भाजपला सत्ता मिळवता आली नसली तरी भाजप प्रणित एनडीए दुसऱ्या क्रमांकावर आहे केरळममध्ये पहिल्यांदाच भाजपला काही जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे नितीन नवीन यांच्या नेतृत्वाची ही विजयी सुरुवात आहे. दरम्यान, भाजप मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गोष्टीचा उल्लेख केला आणि त्यांचे अभिनंदनही केले.