PM Modi | १०३ अमृत भारत रेल्वे स्थानकांचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली : अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत पुनर्विकसित केलेल्या १०३ रेल्वे स्थानकांचे उद्या (गुरुवारी) पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यामध्ये १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८६ जिल्ह्यांमधील रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. हा भारताच्या रेल्वे पायाभूत सुविधांसाठी एक स्मरणीय दिवस ठरणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी (दि.२१) ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आमगाव, चांदा किल्ला, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाद, वडाळा रोड इत्यादी रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
देशातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा केल्या जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. १०३ अमृत स्थानकांच्या पुनर्विकासासाठी १ हजार १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला गेला आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने जारी केल्या पत्रकात म्हटले आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत एकूण १ हजार ३०० पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा आधुनिक सेवा सुविधांसह पुनर्विकास केला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १३२ हून अधिक रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. याअंतर्गत रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधांचा विस्तार केला जात असून या रेल्वे स्थानकांच्या उभारणीत प्रादेशिक वास्तुकलेचे प्रतिबिंब उमटेल अशा दृष्टीने त्यांची रचना केली जात आहे, असे सरकारने म्हटले आहे.

