

PM Modi on Congress protest
नवी दिल्ली : दिल्लीत पार पडलेल्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून केलेल्या आंदोलनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २२) सडेतोड शब्दांमध्ये समाचार घेतला. काँग्रेस आपल्या "घाणेरड्या आणि नग्न राजकारणासाठी" एका जागतिक कार्यक्रमाचा वापर करत असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला.
मेरठ येथील एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, "तुम्ही आधीच वैचारिकदृष्ट्या नागवे आहात, मग तुम्हाला कपडे उतरवण्याची गरजच काय पडली? काँग्रेसच्या नेत्यांनी जे केले ते या देशातील सर्वात जुना पक्ष किती वैचारिकदृष्ट्या दरिद्री झाला आहे, हे दर्शवते. काँग्रेस स्वतःच्याच देशाची बदनामी करण्यात मग्न आहे. देशातील काही राजकीय पक्षांना भारताचे यश पचनी पडत नाहीये. नुकतीच भारतात जगातील सर्वात मोठी एआय परिषद पार पडली. पण काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टमने काय केले? एका जागतिक कार्यक्रमाला त्यांनी आपल्या घाणेरड्या राजकारणाचा अड्डा बनवले, असा आरोपही त्यांनी केला.
एआय समिट हा भाजपचा कार्यक्रम नसल्याचे स्पष्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेस नेते माझा द्वेष करतात, ते माझी कबर खोदू इच्छितात. अगदी माझ्या आईचा अपमान करायलाही ते मागे-पुढे पाहत नाहीत. त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे होते की, ही परिषद राष्ट्रीय कार्याचा भाग होती, भाजपचा कार्यक्रम नव्हता. काँग्रेसने त्या दिवशी सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांच्या या भ्रष्ट धोरणाचा संपूर्ण देश निषेध करत आहे."
शुक्रवारी (दि.21) युवक काँग्रेसच्या एका गटाने अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराचा निषेध करण्यासाठी एआय समिटच्या हॉलमध्ये विना शर्ट (अर्धनग्न) प्रवेश केला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. काहींच्या हातात पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो असलेले टी-शर्ट होते.सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात बाचाबाची झाली. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा हरी (राष्ट्रीय सचिव, युवक काँग्रेस), कुंदन यादव (प्रदेश सचिव, बिहार युवक काँग्रेस),अजय कुमार (उपाध्यक्ष, युपी युवक काँग्रेस) आणि नरसिंह यादव (राष्ट्रीय समन्वयक) यांना अटक केली होती. सर्वांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.