

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 'नवकार महामंत्र दिवस' कार्यक्रमात नवकार महामंत्राचा जप केला. खरा शत्रू बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. नकारात्मक विचार, अविश्वास, स्वार्थ, वैमनस्य याच्याबरोबर आपली खरी लढाई आहे. त्यामुळे नवकार महामंत्र हा खऱ्या अर्थाने मानवता, ध्यान, साधना आणि आत्मशुद्धीचा मंत्र असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी आजपासून ९ संकल्प करण्याचे आवाहन केले.
मोदी म्हणाले, नवकार महामंत्र हा एक मार्ग आहे. असा मार्ग जो माणसाला आतून शुद्ध करतो आणि सुसंवादाचा मार्ग दाखवतो. नवकार महामंत्र म्हणतो की स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा प्रवास सुरू करा, शत्रू बाहेर नाही, शत्रू आत आहे. नकारात्मक विचार, अविश्वास, द्वेष, स्वार्थ हे शत्रू आहेत, त्यांना पराभूत करणे हाच खरा विजय आहे. म्हणूनच जैन धर्म आपल्याला बाह्य जगावर नव्हे तर स्वतःवर विजय मिळविण्याची प्रेरणा देतो. नवकार महामंत्र हा केवळ मंत्र नाही. हे आमच्या श्रद्धेचे केंद्र आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जैन साहित्य भारताच्या बौद्धिक भव्यतेचा कणा आहे. नवीन संसद इमारतीतही जैन धर्माचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. शार्दुल द्वारातून नवीन संसद इमारतीत प्रवेश करताच, गॅलरीमध्ये समेड शिखर दिसते. लोकसभेच्या प्रवेशद्वारावर तीर्थंकरांची मूर्ती आहे. ही मूर्ती ऑस्ट्रेलियाहून परत आणली आहे. संविधान सभागृहाच्या छतावर भगवान महावीरांचे एक अद्भुत चित्र आहे. भिंतीवर सर्व चोवीस तीर्थंकर आहेत, असे मोदींनी सांगितले.
मोदी म्हणाले, जगभरात इतक्या मोठ्या संख्येने नवकार महामंत्राचा एकाच वेळी जप केला जात आहे. आज आपण सर्वांनी ९ संकल्प करावे अशी माझी इच्छा आहे.
पाणी वाचवा
आईच्या नावाने एक झाड लावा
स्वच्छतेचा संकल्प
'वोकल फॉर लोकल' — स्थानिक उत्पादकांना प्राधान्य
देशदर्शन करा
नैसर्गिक शेती स्वीकारा
निरोगी जीवनशैली अंगिकारा
योग आणि खेळ जीवनाचा भाग बनवा
गरजूंना मदत करा
हे ९ संकल्प आपल्याला नवचैतन्य देतील, ही माझी खात्री आहे, असे मोदी शेवटी म्हणाले.
विकसित भारत आपल्या संस्कृतीवर लक्ष केंद्रित करेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. म्हणूनच आपण आपल्या तीर्थंकरांच्या शिकवणी जपतो. जेव्हा भगवान महावीरांच्या २५५० व्या निर्वाण महोत्सवाची वेळ आली तेव्हा आम्ही तो देशभर साजरा केला. आज, जेव्हा परदेशातून प्राचीन मूर्ती परत येतात, तेव्हा आपल्या तीर्थंकरांच्या मूर्ती देखील परत येतात. गेल्या काही वर्षांत २० हून अधिक तीर्थंकरांच्या मूर्ती परदेशातून परत आणल्या गेल्या आहेत, असे मोदींनी सांगितले.