

Narendra Modi on Pahalgam terror attack
दिल्ली : दहशतवाद हा मानवतेसाठी धोका आहे. त्यामुळे दहशतवाद आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावले. हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे अध्यक्ष लॉरेन्को यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत बोलत होते.
अंगोलाचे राष्ट्रपती ३८ वर्षांनी भारत दौऱ्यावर आले आहेत, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्यांच्या या भेटीमुळे भारत-अंगोला संबंधांना नवी दिशा मिळत आहेच, शिवाय भारत-आफ्रिका भागीदारीही बळकट होत असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. यावर्षी भारत आणि अंगोला राजनैतिक संबंधांचा ४० वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. पण आमचे नाते त्यापेक्षा खूप जुने आहे. जेव्हा अंगोला स्वातंत्र्यासाठी लढत होता, तेव्हा भारतही पूर्ण विश्वासाने आणि मैत्रीने उभा राहिल्याचे मोदींनी सांगितले. अंगोलाच्या सैन्याच्या आधुनिकीकरणाला पाठिंबा देण्यासाठी २०० दशलक्ष डॉलर्सची संरक्षण क्रेडिट लाइन मंजूर करण्यात आल्याची घोषणा मोदी यांनी केली. अंगोलासोबत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, अंतराळ तंत्रज्ञानातील अनुभव शेअर केला जाईल. आरोग्यसेवा, हिरे प्रक्रिया, खते आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रात दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मोदी यांनी सांगितले.
दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे यावर आमचे एकमत आहे. दहशतवाद्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्यास वचनबद्ध असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अंगोलाला आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. भारताच्या जी २० अध्यक्षपदाच्या काळात 'आफ्रिकन युनियन'ला जी २० चे कायमचे सदस्यत्व मिळाले हे अभिमानाची गोष्ट असल्याचेही मोदी म्हणाले.