

PM Modi on Giorgia Meloni Autobiography
नवी दिल्ली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या 'आय एम जॉर्जिया - माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स' या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा संदर्भ देत पीएम मोदींनी या पुस्तकाचे वर्णन 'मेलोनींची मन की बात' असे केले आहे.
रूपा पब्लिकेशन्सकडून लवकरच हे पुस्तक प्रकाशित केले जाणार असून मोदी यांनी मेलोनी यांचे देशभक्त आणि एक उत्तम समकालीन नेता अशा शब्दांत कौतुक केले आहे. मोदी यांनी मेलोनी यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास भारतीय लोकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे.
पी एम मोदी यांनी या प्रस्तावनेत मेलोनी यांचे वर्णन एक देशभक्त आणि असामान्य समकालीन नेत्या असे केले आहे. त्यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास भारतीयांच्या मनात खोलवर प्रतिध्वनित होतो. या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणे ही “मोठी सन्मानाची गोष्ट” आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत.
“मी ही प्रस्तावना सन्मान, आदर आणि पंतप्रधान मेलोनींशी असलेल्या मैत्रीपोटी लिहिला आहे. त्यांचा प्रेरणादायी व ऐतिहासिक प्रवास भारतीयांना निश्चितच एका असामान्य समकालीन राजकीय नेत्या म्हणून अनुभवास येईल,” असे मोदी यांनी म्हटले आहे.
आपल्या प्रस्तावनेत मोदींनी गेल्या दशकभरात विविध पार्श्वभूमीच्या जागतिक नेत्यांशी झालेल्या संवादाचा उल्लेख केला आहे. मेलोनींच्या जीवनातून “जिद्द आणि संस्कारांची अढळ सत्ये” अधोरेखित होतात. आपल्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करत जगाशी समानतेच्या भूमिकेत संवाद साधण्याचा मेलोनींचा विश्वास हा आपल्या मूल्यांशी पूर्णपणे साम्य दर्शवतो, असेही त्यांनी लिहिले.