

पुढारी ऑनलाईन डेस्क : 10 years of PM Mudra Yojana| केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान मुद्रा योजनेला आज (दि.८) १० वर्षे पूर्ण झाली. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील मुद्रा लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेद्वारे परिवर्तन झालेल्या लोकांचे अभिनंदन केले आणि सांगितले की, या योजनेने लोकांना सक्षम बनवले, तसेच अनेक स्वप्ने प्रत्यक्षात साकारली.
भारतातील मुद्रा लाभार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदी म्हणाले, आपण मुद्रा योजनेची १० वर्षे साजरी करत असताना, या योजनेमुळे ज्यांचे जीवन बदलले आहे त्या सर्वांचे मी अभिनंदन करू इच्छितो. या दशकात, मुद्रा योजनेने अनेकांची स्वप्ने प्रत्यक्षात साकारली आहेत. ज्यांना पूर्वी दुर्लक्षित केले गेले होते त्यांना आर्थिक मदत देऊन चमकण्यासाठी सक्षम केले आहे. हे स्पष्ट करते की, भारतातील लोकांसाठी काहीही अशक्य नाही, असा विश्वासदेखील पीएम मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
मुद्रा कर्जामुळे लाखो लोकांच्या आशा-आकांक्षा यशस्वी झाल्या. आतापर्यंत ५२ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना ३३ लाख कोटी रुपयांहून अधिक तारणमुक्त कर्जे वितरित केली आहेत. ७०% लाभार्थी महिला आहेत आणि अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायांना महत्त्वपूर्ण पाठिंबा देत असल्याने, या योजनेने तळागाळातील लोकांना सक्षम केले आहे. यांसारख्या योजनेमुळे महत्त्वाकांक्षी उद्योजकांनी सशक्त होऊन देशभरातील त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणली. स्वावलंबी आणि विकासाच्या नवीन युगाची सुरुवात झाल्याचेदेखील पीएम मोदी यांनी म्हटले आहे.
मुद्रा योजनेत सर्वाधिक महिला पुढे आल्या आहेत. महिलांनी सर्वाधिक कर्जासाठी अर्ज केले आहेत. तसेच महिलांना सर्वाधिक कर्ज मिळाले आहे आणि महिला सर्वात जलद कर्ज फेडणाऱ्यादेखील आहेत. माझ्या देशातील अधिकाधिक तरुणांनी या क्षेत्रात यावे अशी माझी इच्छा आहे. मुद्रा योजनेअंतर्गत, देशातील जनतेला हमीशिवाय ३३ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत, असेदेखील पीएम मोदी यांनी म्हटले आहे.
या सर्व लाभार्थ्यांपैकी काहींनी एका व्यक्तीला, काहींनी २ जणांना तर काहींनी ४०-५० जणांना रोजगार दिला आहे. रोजगार उपलब्ध करून देण्याचे हे मोठे काम अर्थव्यवस्थेला चालना देते, असेदेखील पीएम मोदी यांनी मुद्रा लाभार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले.