

केरळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विझिंजम आंतरराष्ट्रीय खोल पाण्यातील बहुउद्देशीय बंदराचे आज (दि.२) उद्घाटन केले. त्यांनी सुमारे ८ हजार ९०० कोटी रुपयांचे केरळला गिफ्ट दिले आहे. तसेच 'विझिंजम' हे आंतरराष्ट्रीय बंदर राष्ट्राला समर्पित करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन देखील उपस्थित होते.
केरळ सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडद्वारे (APSEZ) सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. दक्षिणेकडील राज्याला जागतिक सागरी नकाशावर आणण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.
केरळमधील विझिंजम हे आंतरराष्ट्रीय बंदकर देशातील पहिले अर्ध-स्वयंचलित बंदर आहे. हे जागतिक स्तरावर सर्वात तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक ट्रान्सशिपमेंट बंदरांपैकी एक म्हणून ओळकले जाणार आहे. या बंदरामुळे जहाजांच्या वाहतुकीचा वेळ कमी होण्यास मदत होईल तसेच मोठ्या कंटेनर जहाजांना हाताळण्याची भारताची क्षमता देखील वाढणार आहे. या बंदरामुळे देशाचे इतर आंतरराष्ट्रीय बंदरांवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा आहे.
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी शुक्रवारी (२ मे २०२५) आंध्र प्रदेशच्या ऐतिहासिक भेटीला निघतील. जो राज्याच्या विकासातील एक ऐतिहासिक क्षण आहे. ते अमरावतीमध्ये ५८,००० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. गेल्या दशकात अमरावती बांधकाम कामांचा हा दुसरा शुभारंभ असेल कारण पंतप्रधान मोदींनी यापूर्वी २२ ऑक्टोबर २०१५ रोजी हे काम केले होते.