

नवी दिल्ली : भारताची सेमीकंडक्टर व्यवस्था वेगाने विस्तारत असून, त्यातून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. नवी दिल्ली येथे ‘सेमिकॉन इंडिया २०२६’च्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना भारताला सेमीकंडक्टर उद्योगासाठी जागतिक पसंतीचे केंद्र बनविण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था वाढत असताना देशावरील जगाचा विश्वासही वाढत आहे, असे मोदी यांनी नमूद केले. गेल्या १५ दिवसांतील देशाच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी त्रैमासिक सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) ७.८ टक्के वाढ, ३,००० किलोमीटर लांबीची समर्पित मालवाहतूक मार्गिका कार्यान्वित होणे आणि आर्थिक क्षेत्रातील घडामोडींचा दाखला दिला.
१३.५ अब्ज डॉलरच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा
सेमीकंडक्टर अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १३.५ अब्ज डॉलरची तरतूद करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. आंतरराष्ट्रीय कंपन्या, स्टार्टअप्स आणि डिझाइन संस्थांमधील सहकार्य वाढविण्यासाठी नवीन नियामक सुधारणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मोहाली आणि सुरत येथील दोन प्रकल्पांमध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू झाले असून, भारतात तयार होणाऱ्या चिप्स देशांतर्गत तसेच जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचू लागल्याचे मोदी यांनी नमूद केले. चिप डिझाइन, उपकरण निर्मिती आणि चाचणी क्षमतांमध्ये देशाने विक्रमी वेळेत प्रगती केल्याचेही त्यांनी सांगितले.
संपूर्ण पुरवठा साखळी उभारण्यावर भर
सेमीकंडक्टर क्षेत्रातील देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी उपकरणे, रसायने, वायू आणि इतर साहित्य क्षेत्रातील कंपन्यांनी संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. मान्यताप्राप्त १२ प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण सेमीकंडक्टर व्यवस्था एकत्रितपणे विकसित करण्यावर भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या मागणीमुळे सेमीकंडक्टर उद्योगात केवळ ट्रान्झिस्टरचा आकार कमी करण्याऐवजी संपूर्ण प्रणालीचे एकत्रीकरण, मेमरीची मांडणी आणि उष्णता व्यवस्थापन यांना महत्त्व प्राप्त झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
युवा संशोधक आणि उद्योगांना आवाहन
भारतात संशोधन करणाऱ्या युवा प्रतिभावंतांनी पुढे यावे, तसेच परदेशात संशोधन करणाऱ्या भारतीय तरुणांनीही देशातील प्रगत तंत्रज्ञानाच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. उद्योग क्षेत्रातील धुरिणांनी देशातील संशोधन आणि विकासाचे नेतृत्व करावे. यामुळे उद्योगाच्या वाढीला चालना मिळण्याबरोबरच भारताच्या युवाशक्तीलाही बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले. चिप डिझाइनसाठी देशात कौशल्यविकास उपक्रम राबविण्यात येत असून, एक लाख अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ७० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे मोदी यांनी नमूद केले.
ऊर्जा सुरक्षेलाही प्राधान्य
कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांसाठी अखंडित वीजपुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे भारत ऊर्जा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असल्याचे मोदी यांनी सांगितले. सौर ऊर्जा क्षमतेत १६० गिगावॅटपेक्षा अधिक वाढ, अणुऊर्जा क्षेत्रात खासगी कंपन्यांचा सहभाग आणि लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या विकासाचा त्यांनी उल्लेख केला. जग उत्पादनासाठी विश्वासार्ह आणि नवीन ठिकाणांच्या शोधात आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारत स्वतःला सातत्याने तयार करत असून, सेमीकंडक्टर उद्योगासाठी विश्वासार्ह केंद्र म्हणून देशाचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.