

PM Modi In China
जपानचा दौरा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदे निमित्त चीनमध्ये दाखल झाले आहेत. सात वर्षांनंतर त्यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. अमेरिकेच्या टॅरिफ वाढीच्या घाेषणेच्या पार्श्वभूमीवर हाेत असलेल्या या दाैर्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला भेट द्यावी, असे निमंत्रण राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दिले होते. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होण्यासाठी ही निमंत्रण महत्त्वपूर्ण मानले गेले. कारण २०२० मध्ये सीमावादामुळे दोन्ही देशांमधील संबंधामधील तणाव वाढला होता. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान भारताने रशियन तेलाची खरेदी केली, असे कारण सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लावले, यामुळे अमेरिकने टॅरिफ ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. आता पंतप्रधान मोदींचा हा दौरा अमेरिकेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी तिआनजिन येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेत सहभागी होणार आहेत. भारत २०१७ पासून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा सदस्य आहे. रविवार, ३१ ऑगस्ट रोजी चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका स्वागत समारंभात सहभागी होतील. यानंतर मुख्य नेत्यांची शिखर परिषद सोमवार, १ सप्टेंबर रोजी होणार आहे. असे मानले जात आहे की, या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांचा भारताच्या सीमापार दहशतवादाविरोधातील भूमिका जोरकसपणे मांडण्यावर भर असेल. जम्मू-काश्मीरमधील पहलगामवरील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या संघर्ष आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
SCO शिखर परिषदेसोबतच पंतप्रधान मोदींची चीनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच, ते या परिषदेत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेणार आहेत. या परिषदेदरम्यान अनेक द्विपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्या आम्ही त्या बैठका अंतिम करत आहोत आणि त्यासंबंधीची माहिती वेळोवेळी दिली जाईल,” असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी जपान आणि चीन दौऱ्याबाबत दिलेल्या माहितीपत्रकात नमूद केले आहे.