

पुढारी ऑनलाईन डेस्क: जगातील दोन बलाढ्य महासत्ता असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धामुळे एकीकडे दोन्ही देशांतील तणाव अधिक तीव्र झालेला आहे. दोन्ही देश एकमेकांची कशी जिरवायची याची रणनीती आखत आहेत.
अशा स्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे चक्क कौतूक केले आहे. जिनपिंग हे जगातील एक अत्यंत बुद्धीमान व्यक्ती आहेत, असे कौतुकोद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत. ट्रम्प यांच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नुकतेच ट्रम्प यांनी 75 देशांना आश्चर्याचा धक्का देत टॅरिफची अंमलबजावणी 90 दिवसांसाठी स्थगित केली आहे. तथापि, हे करत असताना त्यांनी एकमेव चीनला मात्र यातून वगळले आहे. त्यांनी चीनवर आर्थिक हल्ला चढविताना चिनी आयातीवर कर 125 टक्के इतका केला आहे.
ट्रम्प यांनी चीनविरोधात आत्तापर्यंतची सर्वाधिक कठोर व्यापार धोरणे मंजूर केलेली असली तरी "चिनी राष्ट्राध्यक्ष शी हे खूप हुशार आहेत. शी हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांना नेमकं काय करायचं आहे ते माहीत आहे. त्यांना त्यांचा देश खूप प्रिय आहे.
मी शी यांच्याशी थेट बोलण्यास तयार आहे. लवकरच फोन येईल आणि मग गोष्टी भराभर पुढे जातील. अखेर आम्ही एक उत्कृष्ट करार करू, असा आशावाद ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, ट्रम्प यांनी केलेली जिनपिंग यांची ही स्तुती अत्यंत दुर्मीळ होती आणि ती त्यांच्या धोरणातील मोठ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर आली.
दरम्यान, गुरुवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते योंगचियान म्हणाले, "चीनची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे. अमेरिकेला जर संवाद साधायचा असेल, तर आमचे दरवाजे उघडे आहेत.
पण संवाद हा परस्पर सन्मान आणि समतेवर आधारित असावा. अमेरिकेने जर लढा द्यायचा ठरवलं तर आमची प्रतिक्रिया अखेरपर्यंत चालेल. दबाव, धमक्या आणि जबरदस्ती हे चीनशी व्यवहार करण्याचे योग्य मार्ग नाहीत."
ट्रम्प म्हणाले होते की, मी 90 दिवसांचं स्थगिती ज्यांनी पलटवार केला नाही त्यांच्यासाठी आहे. कारण मी त्यांना आधीच सांगितलं होतं जर तुम्ही पलटवार केला, तर आम्ही ते दुप्पट करू आणि तसंच मी चीनसाठी केलं. ही चाल आवश्यक होती.
लोक जास्तच गोंधळ घालू लागले होते. या रणनीतीचा मूळ उद्देश स्पष्ट आहे – चीनला आर्थिकदृष्ट्या एकटे पाडणे आणि इतर देशांना अमेरिकेच्या बाजूला आणणे. पलटवार करू नका तुम्हाला बक्षीस मिळेल," असे व्हाईट हाऊसने सोशल मीडियावर म्हटले आहे.
दरम्यान चीनने अमेरिकन वस्तूंवर 84 टक्क्यांपर्यंत कर लावण्याची घोषणा केली. आधीचा दर 34 टक्के होता. तसेच, चीनने जागतिक व्यापार संघटनेत नवीन तक्रार दाखल केली, अमेरिकेवर बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला.
शिवाय 12 अमेरिकन कंपन्या बीजिंगच्या "निर्यात नियंत्रण यादीत" टाकल्या आणि आणखी 6 कंपन्यांना "अविश्वासार्ह घटक" यादीत टाकले.