

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान परदेश दौऱ्यावर आहेत. ते नायजेरिया, ब्राझील आणि गुयाना या देशांना भेटी देणार आहेत. पीएम मोदी रविवारी (दि.१७) नायजेरिया दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अबुजा याठिकाणी नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांची भेट घेतली. या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांदीचा 'सिलोफर पंचामृत कलश' नायजेरियाच्या राष्ट्रपतींना भेट दिला. हा कलश कोल्हापूरमध्ये साकारल्याचे वृत्त 'PTI' ने दिले आहे.
नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच नायजेरिया दौऱ्यावर आले होते. तब्बल १७ वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा सर्वोच्च सन्मान, ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले.
या वेळी पंतप्रधान मोदींनी नायजेरियाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रातील कोल्हापूर पारंपारिक कारागिरीचे एक अप्रतिम कलाकुसर असलेला चांदीचा कलश भेट म्हणून दिला. या कलशावर कोल्हापूरच्या प्रसिद्ध धातूकामाचे वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. फुलांचे नमुने, देवता आणि कोल्हापूरच्या पारंपरिक रचनांचा समावेश आहे. कलशाचे हँडल आणि झाकण धार्मिक समारंभांमध्ये वापरण्यास सुलभतेसाठी तयार केले आहे.चामृत ( दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे पवित्र मिश्रण) दिले जाईल, असे देखील वृत्तात म्हटले आहे.
नायजेरियाचा दौरा पूर्ण करून पीएम मोदी सध्या ब्राझील दौऱ्यावर आहेत. ते रिओ डी जनेरियो येथे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेत सहभागी होतील. भारत देखील G20 चा भाग असून ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका देखील सहभागी आहेत. या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी विविध जागतिक मुद्द्यांवर भारताची भूमिका मांडतील. 20 नवी दिल्ली लीडर्स डेक्लरेशन आणि गेल्या दोन वर्षांत भारताने आयोजित केलेल्या "व्हॉईस ऑफ द ग्लोबल साउथ" शिखर परिषदेच्या परिणामांवर चर्चा करतील. G20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान अनेक देशांच्या नेत्यांनाही भेटू शकतात.