

PM Modi Constitution Day
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनाचे औचित्य साधत देशातील नागरिकांना एक भावनिक पत्र लिहून आपले कर्तव्य हेच सर्वोच्च मानण्याचे आवाहन केले आहे. येत्या २०२४७ पर्यंत 'विकसित भारत' हे ध्येय साधण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
संविधानाचा स्वीकार होऊन ७६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जारी केलेल्या या पत्रात, पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या लोकशाही भविष्यासाठी नागरिकांची जबाबदारी, विशेषत: मतदान करणे आणि तरुणांचा सक्रिय सहभाग, यावर विशेष भर दिला आहे.
देशाच्या प्रगतीसाठी कर्तव्ये पूर्ण करणे किती महत्त्वाचे आहे, हे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. "आपले प्रत्येक कार्य हे संविधानाला बळकट करणारे आणि राष्ट्रीय उद्दिष्ट्ये व हितसंबंधांना पुढे नेणारे असावे," असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
त्यांनी नागरिकांना राष्ट्रनिर्मितीबद्दल कृतज्ञता बाळगण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “जेव्हा आपण या भावनेने जगतो, तेव्हा कर्तव्ये पूर्ण करणे हा आपल्या स्वभावाचा अविभाज्य भाग बनतो.” संविधानाच्या याच 'शक्ती आणि पावित्र्यामुळे' आपल्यासारख्या कोट्यवधी लोकांना सक्षम बनवले, असेही त्यांनी सांगितले.
"माझ्यासारख्या एका गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला सरकारचे प्रमुख म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली, ही आपल्या संविधानाचीच ताकद आहे," असे त्यांनी नमूद केले. २०१४ मध्ये संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणे आणि २०१९ मध्ये संविधानाला कपाळावर लावणे, हे क्षण लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीचे प्रतीक आहेत, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी मतदानाला एक अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य मानण्याचे आवाहन केले आहे. "नागरिक म्हणून, मतदानाची संधी कधीही गमावू नये हे आपले कर्तव्य आहे," असे ते म्हणाले. यापुढे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'प्रथम मतदार' यांचा सन्मान करण्यासाठी विशेष समारंभ आयोजित करावेत, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सध्या एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. शतकाची २५ वर्षे पूर्ण झाली असून, २०४७ मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी आणि २०४९ मध्ये संविधानाची १०० वर्षे असे महत्त्वाचे टप्पे गाठायचे आहेत. आज आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयामुळे येणाऱ्या पिढ्यांचे जीवन घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.