PM Modi Bengaluru visit security breach
बंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळूर दौऱ्यादरम्यान सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह ६ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. १० मे रोजी पंतप्रधानांचा बंगळुरूमधील 'आर्ट ऑफ लिव्हिंग' आश्रमात दौरा होता. या दौऱ्याच्या मार्गापासून अवघ्या २ किमी अंतरावर स्फोटके आढळून आली होती. या घटनेनंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर अखेर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
बंगळूर दक्षिणचे पोलीस अधीक्षक आर. श्रीनिवास गौडा यांनी हे आदेश दिले असून, निलंबित कर्मचाऱ्यांची नावे मात्र अद्याप गोपनीय ठेवण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदींचा ताफा ज्या मार्गावरून जाणार होता, त्या मुख्य रस्त्यापासून अवघ्या २५ फुटांवर असलेल्या एका खासगी जागेच्या कम्पाउंड वॉलजवळ एक संशयास्पद खोका आढळून आला होता. पंतप्रधानांचा ताफा तेथून जाण्याच्या साधारण दीड तास आधी एका पोलीस कॉन्स्टेबलने हे खोके शोधून काढले होते. या खोक्यामध्ये दोन जिलेटीनच्या कांड्या, काडेपेटी, कापूर, बॅटऱ्या, वायर्स, एक घड्याळ आणि एलसीडी डिस्प्ले यांसारखे घातक साहित्य अत्यंत हुशारीने पॅक करण्यात आले होते.
या प्रकरणाचा तपास करताना सुरुवातीला पोलिसांनी केवळ दोन जिलेटीनच्या कांड्या आणि काडेपेटी सापडल्याचे सांगितले होते. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली, तेव्हा या खोक्यातील इतर तांत्रिक घटकांचा खुलासा झाला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची पथके शेजारील तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील इतर जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आली आहेत. एनआयए आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाला असून, सापडलेल्या स्फोटकांपासून कोणताही थेट धोका नव्हता, असे त्यात नमूद केले आहे. खोक्यात सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सुमारे तीन वर्षे जुन्या होत्या, टाइमर बंद पडलेला होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोक्यात डिटोनेटर नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही गंभीर त्रुटी मानली जात आहे.