

Piyush Pandey on the making of Mile Sur Mera Tumhara:
कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्वांना राष्ट्रीयत्वाच्या एका माळेत ओवणारं गाणं म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा... हे गाणं आजही टीव्हीवर लागलं तरी अंगावर शहारे येतात. कोणी हे गाणं मधेच बंद केलंय असं होणार नाही. या गाण्याची जादू भारतीयांच्या मनावर गारूड करून आहे. भारत म्हणजे काय हे थोडक्यात अन् अत्यंत प्रभावीपणे सांगणारं हे गाणं तयार केलंय ते लेजंडरी अॅड मेकर पियूष पांडे यांनी... हो हे तेच पियूष पांडे आहेत ज्यांनी फेव्हिकॉल, वोडाफोन, कॅडबरी, एशियन पेंट्स सारख्या अनेक ब्रँड्सना आपल्या अफलातून क्रिएटिव्हिटीच्या जोरावर मोठं केलं. या पियूष पांडेंचं आज (दि. २४ ऑक्टोबर) वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळं देशानं एक दर्जेदार क्रिएटिव्ह पर्सन गमावला आहे.
पियूष पांडे यांनी लिहिलेल्या या ६ मिनिटाच्या गाण्यातून भारताचं विविधतेत एकता हे सूत्र अधोरेखित करण्यात आलं. १९८८ साली तयार झालेलं हे गाणं आजच्या परिस्थितीत देखील अत्यंत चपखल बसतं. याचे बोल संगीत आणि चित्रिकरण सर्वच बाबतीत हे गाणं एक मैलाचा दगड ठरलंय. या गाण्याला रिप्लेस करणारं गाणं अजून तरी कोणी तयार करू शकलेलं नाही.
या गाण्याची मूळ संकल्पना ही लोक सेवा संचार परिषदेची होती. ती दूरदर्शन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रमोट केली. हे गाणं तयार करण्यामागचा मूळ उद्येश हा भारताच्या भाषा, संस्कृतिक आणि धार्मिक विविधतेचा सोहळा साजरा करणं आणि त्यातून राष्ट्रीयत्वाची एक जाणीव निर्माण करणं हा होता.
या गाण्याला चाल देण्याचं काम महान शास्त्रीय संगीत गायक पंडित भिमसेन जोशी यांनी केलं. तर या गाण्याचे बोल लिहिण्याची जबाबदारी पियूष पांडे यांच्यावर सोपवण्यात आली होती. पंडित भिमसेन जोशी यांनी हे गाणं राग भैरवीवर आधारित असावं असं सुचवलं होतं. त्यानंतर सुरेश मुल्लिक यांनी यासाठी हिदुस्तानी, शास्त्रीय संगीत आणि मॉडर्न वाद्यांच्या मिलाफातून हे तयार करण्यात यावं असं सुचवलं.
यानंतर याचे बोल लिहिण्याची महत्वाची जबाबदारी ही पियूष पांडे यांच्याकडे आली. त्यांनी यासाठी १७ ड्राफ्ट लिहिले होते. अखेर त्यांचा १८ वा ड्राफ्ट हा फायनल करण्यात आला.
विशेष म्हणजे या गाण्याचे बोल (Lyrics) लिहिण्यासाठी अनेक ख्यातनाम गीतकारांना संपर्क करण्यात आला होता, पण सुरेश मुल्लिक यांना हवी असलेला साधेपणा (Simplicity) आणि भावनिक ओढ त्यांच्याकडून मिळाली नाही.
प्रेरणा (Inspiration): मुल्लिक यांनी शेवटी, त्यावेळी ओगिल्वीमध्ये अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या आणि जाहिरात लेखन करणाऱ्या पीयूष पांडे यांना हे काम दिले. पांडे यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारली. त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, गाणे अति-राष्ट्रवादी नसावे, तर 'सूर' या एकाच धाग्याने देशाला एकत्र आणणारे असावे.
पियूष पांडेंचा या गाण्याचे बोल लिहण्यापुरताच रोल मर्यादित नव्हता. तर त्यांच्या गाण्यानं राष्ट्रीय भावनेचा प्रसार देखील केला. हे ६ मिनिटाचं गाणं भारतीयांच्या अनेक पिढ्यांच्या लक्षात राहणारं आहे.
आजच्या घडीला देशात धार्मिकता प्रखर होत आहे, भाषेबाबत वाद निर्माण होत आहेत, सोशल मीडियाद्वारे लोकांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा पार्श्वभूमीवर हे गाणं आजही शांतीचं अन् आशेचं प्रतिक म्हणून समोर येतं. तुमची भाषा कोणतीही असो मात्र आमचं गाणं आजही सद्भावना निर्माण करतं.
असं हे अजरामर गाणं लिहिणारे पियूष पांडे हे काळाच्या पडद्याआड गेलेत. मात्र त्यांची ही कलाकृती जोपर्यंत भारतीयत्व अस्तित्वात आहे तोपर्यंत जिवंत राहील हे मात्र नक्की!