

Parliament Winter Session
नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
रिजिजू यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १ डिसेंबर २०२५ ते १९ डिसेंबर २०२५ पर्यंत संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आपल्या लोकशाहीला बळकटी देणाऱ्या आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या रचनात्मक आणि अर्थपूर्ण अधिवेशनाची अपेक्षा आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे. नरेंद्र मोदी निवडणुका चोरून पंतप्रधान झाले आहेत, असा दावा करत आपल्याकडे यासाठी खूप पुरावे असून हे सत्य तरुण पिढीसमोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मोदी, अमित शहा आणि निवडणूक आयोग मिळून राज्य घटनेवर हल्ला करत आहेत, असे राहुल गांधींचा आरोप आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन याच मुद्द्यावरून गाजणार आहे.