

pakistan broke the ceasefire drone attacks and shelling again in jammu and kashmir
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (दि. 10) युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर काही तासांतच त्याचे पाककडून उल्लंगन झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी पाक रेंजर्सकडून गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. तथापि, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये, ‘ही कोणत्या प्रकारची युद्धबंदी आहे? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज सतत ऐकू येत आहेत,’ असे म्हटले आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी आणखी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, ‘येथे कोणताही युद्धविराम झालेला नाही. श्रीनगरमध्ये हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत.’ या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.
ओमर अब्दुल्ला यांच्या या ‘एक्स’ पोस्टमुळे पाकिस्तानकने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे वृत्त अनेक टीव्ही वाहिन्यांनी प्रसिद्ध केले. मात्र, भारतीय लष्कराकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. तसेच त्यावर कसलेही निवेदन जाहीर केलेले नाही.
दरम्यान, संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांशी पडताळणी केल्याशिवाय युद्धबंदीच्या उल्लंघनाच्या बातम्या प्रसारित करू नयेत अशी विनंती माध्यमांना करण्यात येत आहे. काही चॅनेल्सनी स्थानिक आणि अप्रमाणित माहितीच्या आधारे अशा बातम्या प्रसारित केल्या आहेत. त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्वरित अशा बातम्या टीव्ही आणि सोशल मीडियावरून हटवाव्यात, असे सांगण्यात आल्याचा संदेश सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील 86 तास चाललेले युद्ध शनिवारी संध्याकाळी 5 वाजता संपले. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली. पण त्यानंतर अवघ्या 4 तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे वृत्त समोर आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानच्या प्रक्षोभक कारवाया पुन्हा एकदा तीव्र झाल्या केल्याचे काहींचे म्हणणे आले. शनिवारी रात्री, पाकिस्तानने अनेक भागात युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा जोरदार गोळीबार केल्याचा व्हिडिओ एएनआयने त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला. दरम्यान, भारतीय लष्कराने या वृत्ताल अद्याप दुजोरा दिलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफ गोळे डागल्याचे समोर आले. त्याचवेळी बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला. जम्मूच्या पालनवाला सेक्टरमध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय राजस्थानमधील पोखरणमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले होत असल्याचे वृत्त समोर येत असून भारतीय संरक्षण यंत्रणा त्यांना नष्ट करत आहे. राजौरीमधूनही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.